Covid Update : कोरोनाचा कहर! 24 तासांत आढळले अडीच लाखांहून अधिक रुग्ण, 385 मृत्यू
कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे देशात तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून, दररोज लाखो नागरिक कोविड पॉझिटिव्ह आढळून येत आहे. गेल्या 24 तासांतही देशात अडीच लाखांहून अधिक कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्याही 8 हजारांच्या पार गेली आहे. तर 385 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 58 हजार 89 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या (16 जानेवारी) तुलनेत रुग्णसंख्येत घट झाली असून, रुग्णसंख्येत 13,113 रुग्णांची घट झाली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णसंख्या 16 लाखांहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे 24 तासांच्या कालावधीत 1,51740 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर 385 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
सध्या देशातील संसर्गाचा दर 19.65 टक्के इतका असून, आठवड्याचा संसर्ग दर 14.41 टक्के इतका आहे. मागील 24 तासांत देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 52.6 टक्के रुग्ण पाच राज्यांत आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 16.01 टक्के इतकी आहे. महाराष्ट्र (41,327), कर्नाटक (34,047), तामिळनाडू (23,975), दिल्ली (18,286) आणि केरळात (18,123) रुग्ण आढळून आले आहेत.

ओमिक्रॉन रुग्णवाढीचा आलेख कायम
देशात कोरोना रुग्णसंख्येबरोबरच ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची एकूण रुग्णसंख्या 8,209 वर पोहोचली आहे. यापैकी 3,109 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 1,738 रुग्ण आढळून आले असून, यापैकी 932 बरे होऊन घरी परतले आहेत. महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगालमध्ये 1,672 रुग्ण आढळून आले. त्यापैकी 22 रुग्ण बरे झाले आहेत.