
देशात लाखोंच्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळून येत असले, तरी गेल्या काही दिवसांत दैनंदिन आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी झालीये का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. तज्ज्ञांनी जानेवारीच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्या शिखर गाठेल असा अंदाज व्यक्त केलेला होता. आता भारतात २३ जानेवारी रोजी कोरोना रुग्णसंख्या शिखर गाठेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात देशात ७ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळतील असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा थैमान सुरू असून, कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंटनंही काळजीत भर टाकली आहे. असं असलं तरी मागील काही दिवसांत दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात २,३८,०१८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या (१७ जानेवारी) तुलनेत रुग्णसंख्येत ७.८ टक्के घट झाली आहे. ३१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, काही राज्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग घटल्याचं दिसत आहे. मागील तीन आठवड्यांच्या कालावधीत दोन्ही ठिकाणी कोरोनाचा वेग प्रचंड वाढला होता. त्यातच नव्या आकडेवारीनं तज्ज्ञांनाही बुचकळ्यात टाकलं आहे. आतापर्यंत दररोज रुग्णवाढ होताना दिसत होती. मात्र, मागील तीन दिवसांच्या तुलनेत आज कोरोना रुग्णसंख्येत पाच टक्क्यांची घट झाली आहे. तर दुसरीकडे देशातील पॉझिटिव्ही रेट वाढून १९.६५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोना चाचणी करण्याच्या निकषात आयसीएमआरकडून बदल करण्यात आले आहेत. लक्षणं दिसून आलेल्या व्यक्तींच्याच चाचण्या केल्या जात आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करणं बंद करण्यात आलं आहे. याचा परिणाम आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर दिसून आला आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट मात्र वाढला आहे.
'कोरोना पीक'बद्दल आयआयटी कानपूरमधील प्राध्यापकाचं भाष्य
आयआयटी कानपूर येथील प्रा. मणींद्र अग्रवाल यांनी भारतातील कोविड लाटेचा प्रादुर्भाव फेब्रुवारीपर्यंत संपेल असं म्हटलं आहे. "आतापर्यंत कोणत्याही राज्यात 'कोरोना पीक'सारखे रुग्णांची नोंद झालेली नाही. उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यात आठवडाभरात पीक येऊन जाईल," अग्रवाल यांनी म्हटलं आहे. सूत्र मॉडलच्या आधारे केलेल्या अभ्यासानुसार देशात जानेवारीच्या अखेरपर्यंत कोरोना पीक असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना चाचण्यांच्या नियमावलीत बद्दल केल्याने 'कोरोना पीक'बद्दलचा अंदाज तंतोतंत जुळलेला नाही. नव्या नियमावलीनंतर कोरोना चाचण्या कमी होत आहे. जसं की १५ ते १६ जानेवारीला दिल्लीतील रुग्णसंख्या शिखर गाठण्याचा अंदाज होता. अंदाजाप्रमाणे ४५ हजार रुग्णांची नोंद व्हायला हवी होती. पण, २८ हजारांच्याच जवळपास रुग्ण आढळून आले.
मुंबईतही कोरोना पीक येऊन गेला आहे. मुंबईबद्दल व्यक्त करण्यात आलेला अंदाज जवळपास ७२ टक्के बरोबर ठरला आहे. त्याचबरोबर कोलकातामध्ये १३ जानेवारीला कोरोना पीक येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. तो ७० टक्के खरा ठरला आहे, असं अग्रवाल म्हणाले.