
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असतानाच देशात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. एका आठवड्यापासून देशातील दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारी आढळलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रविवारी रुग्णसंख्येत 22.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रासाठी काळजीची बाब म्हणजे सध्या देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात आढळून येत आहे.
देशात गेल्या 24 तासांच्या कालावधीत 33,750 रुग्णांना कोरोना झाल्याचं निदान झालं. शनिवारी (27,553) आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रविवारी 22 टक्के जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 3,49,22,882 वर पोहोचली आहे.
सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात रविवारी 11,877 रुग्णसंख्येची नोंद झाली. त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये 6,153, दिल्लीत 3,194 रुग्ण, केरळमध्ये 2,802 रुग्ण आणि तामिळनाडूमध्ये 1,594 रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी 75.9 टक्के रुग्ण या पाच राज्यांमध्ये आढळले आहेत. यात एकट्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 35.19 टक्के आहे. मागील 24 तासांत देशात 123 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.
गेल्या 24 तासांच्या कालावधीत सर्वाधिक मृत्यू केरळमध्ये नोंदवले गेले आहेत. केरळात 78, तर त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा वाढून 4,81,893 वर पोहोचला आहे.
ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांची संख्या 1700
कोरोना रुग्णसंख्येबरोबरच ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉन बाधितांची देशातील एकूण संख्या 1700 वर पोहोचली आहे. यापैकी 639 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून, दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे. महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 510 झाली आहे. यापैकी 193 बरे झाले आहेत. दिल्लीत 351 रुग्ण आढळून आले असून, 57 बरे झाले आहेत.