
कोरोनाच्या चौथ्या लाटेचं ढग गडद होण्याची चिन्ह असतानाच ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या आपतकालीन वापराला परवानगी दिली आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात असून, ६ ते १२ वयोगटातील लहान मुलांनाही लवकरच कोरोनापासून संरक्षण मिळणार आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून, लहान मुलांना पटकन संसर्ग होताना दिसत आहे. कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटचा लहान मुलांवर परिणाम होत असल्याचंही आढळून आलं आहे. त्यामुळे चिंता केली जात असतानाच आता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) कोव्हॅक्सिन लसीचा ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.
त्याबरोबर ५ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोर्बोव्हॅक्स आपतकालीन वापराला परवानगी दिली असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
कोर्बोव्हॅक्सबरोबरच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने १२ वर्षांपुढील मुलांसाठीच्या लसीकरणासाठी झायकोव्हडी (ZycovD/Zydus Cadila vaccine) या लसीच्या आपतकालीन वापरला परवानगी दिली आहे.
मुलांमध्ये दिसणारी कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटची लक्षणे
कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटचा संसर्गाचा वेग मागील व्हेरियंटपेक्षा अधिक असल्याचा सांगितला जात आहे. त्यामुळे लहान मुलांना संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
१) ताप
२) सर्दी
३) घशात खवखव
४) अंगदुखी
५) कोरडा खोकला
६) मळमळ होणे
७) जुलाब
तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे लहान मुलांना सूजही येऊ शकते. शरीरावरील सूज अनेक आठवडे राहू शकते. लहान मुलांच्या अंगावर येणाऱ्या या सूजेला मल्टिसिस्टिम इंफ्लेमेटरी सिंड्रोम म्हटलं जातं. यातील सर्वसाधारण लक्षणांमध्ये ताप, मानदुखी, डोळे लाल होणं, अशक्तपणा, ओठ फाटणे, हाथ आणि पाय सुजणे, गळ्यात सूज आणि पोटदुखी यांचा समावेश आहे.
अशी लक्षणं मुलांमध्ये दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांना दाखवण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
लहान मुलांमध्ये मल्टिसिस्टिम इंफ्लेमेटरी सिंड्रोममध्ये लहान मुलांच्या विविध भागावर सूज येते. यामध्ये ह्रदय, फुफ्फुस, डोकं, त्वचा, डोळे आदी भागांवर सूज येते. मल्टिसिस्टिम इंफ्लेमेटरी सिंड्रोम नेमकं कशामुळे होतो, याबद्दलची निश्चित कारण अद्याप सापडलेली नाहीत. मात्र, जास्तीत जास्त मुलांमध्ये कोरोनामुळे मल्टिसिस्टिम इंफ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणं आढळून येत आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार वेळेवर उपचार केल्यास मुलं या सिंड्रोममधून बरी होऊ शकतात.