
जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आलेल्या एक्सई व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण मुंबईत आढळला आहे. मुंबईतील सांताक्रूझ भागात ओमिक्रॉनचा सब व्हेरियंट असलेल्या एक्सई विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणांच्या काळजीतही भर पडली आहे.
मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीप्रमाणे सांताक्रूझ भागातील एका व्यक्तीला एक्सई व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. ११ मार्च रोजी ही व्यक्ती कामानिमित्त वडोदरा येथे गेलेली होती. तिथे हॉटेलमध्ये झालेल्या एका बैठकीला ही व्यक्ती हजर होती. त्यानंतर या व्यक्तीची तब्येत बिघडली.
प्रकृती बिघडल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना रिपोर्टमध्ये त्यांना संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्या व्यक्तीला एक्सई व्हेरियंटचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं आहे. या ६७ वर्षीय व्यक्तीला कोणतीही लक्षणं नाहीत. त्याचबरोबर या व्यक्तीचे दोन्ही डोज पुर्ण झालेले आहेत. या व्यक्तीच्या नमुन्यांचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना एक्सई व्हेरियंटचा संसर्ग झालेला होता, ही बाब समोर आली.
या व्यक्तीच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. सध्या या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. त्याचबरोबर प्रकृती स्थिर आहे, असंही महापालिका प्रशासनाने म्हटलं आहे.
कोरोनाच्या एक्सई या नवीन व्हेरियंटने गुजरातमध्ये आधी शिरकाव केलेला आहे. १३ मार्च रोजी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर एका आठवड्याने या व्यक्तीची प्रकृती पुन्हा चांगली झाली, मात्र, जेव्हा चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्याचे रिपोर्ट मिळाले. तेव्हा या व्यक्तीला एक्सई व्हेरियंटचा संसर्ग झालेला होता, अशी माहिती समोर आली होती.
काही दिवसांपूर्वी मुंबई एका ५० वर्षीय महिलेला एक्सई व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले असतानाही या महिलेल्या लागण झाली होती, मात्र कोणतीही लक्षणं नव्हती. ही महिला १० फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आली होती. मुंबई महापालिकेनं याबद्दल खात्री केली होती. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही केस एक्सई व्हेरियंटची नसल्याचं म्हटलं होतं.
BA.2 स्ट्रेनपेक्षा १० टक्के अधिक संसर्गजन्य
कोरोनाचा एक्सई हा विषाणू ओमिक्रॉनच्या BA.2 या व्हेरियंटपेक्षा १ ० टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरियंटबद्दल आधीच चिंता व्यक्त केली आहे.