Covishield vaccine Price : कोविशिल्ड लसीच्या किंमतीमध्ये मोठी कपात, पूनावालांची घोषणा

Covishield vaccine price : कोविशिल्ड लसीचा एक डोज ६०० ऐवजी मिळणार २२५ रुपयांना; खासगी रुग्णालयांसाठी सीरमचा निर्णय
Covishield vaccine Price : कोविशिल्ड लसीच्या किंमतीमध्ये मोठी कपात, पूनावालांची घोषणा

सगळीकडे महागाईची चर्चा सुरू असताना सीरम इन्स्टिट्यूटने आज मोठा निर्णय घेतला आहे. 'सीरम'चे सीईओ अदर पूनावाला यांनी आज कोविशिल्ड लसीच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली असल्याची घोषणा केली. खासगी रुग्णालयांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून, आतापर्यंत ६०० रुपयांना मिळणारा कोविशिल्डचा डोज आता २२५ रुपयांना मिळणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी आज ट्विट करत कोविशिल्डच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली असल्याची माहिती दिली.

अदर पूनावाला म्हणाले, "ही घोषणा करताना मला आनंद होत आहे की, केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने खासगी रुग्णालयांसाठीच्या कोविशिल्ड लसीची किंमत प्रति डोज ६०० रुपयांवरून २२५ रुपये इतकी करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांपुढील सर्वांसाठी बुस्टर डोज घेण्यास परवानगी देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं कौतुक करतो," असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने १८ वर्षांपुढील सर्वांसाठी बुस्टर डोज देण्यास परवानगी दिल्यानंतर सीरम इन्सिस्ट्यूटकडून निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बुस्टर डोज आता २२५ रुपयांना मिळणार आहे. १८ वर्षांपुढील सर्व नागरिक ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले आहेत. ते खासगी रुग्णालयात जाऊन बुस्टर डोज घेऊ शकणार आहेत. बुस्टर डोज घेण्यासाठी दुसरा डोज घेऊन ९ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला असावा. तेव्हाच बुस्टर डोज घेता येणार आहे.

कोरोनापासून संरक्षण करणारी रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहावी यासाठी बुस्टर डोज दिला जात आहे. कोरोना विषाणूचे आतापर्यंत डेल्टा, डेल्टा प्लस, ओमिक्रॉन, डेल्टाक्रॉन, एक्सई, काप्पका व्हेरियंट आढळून आलेले आहेत. त्यामुळे या सर्व व्हेरियंटपासून संरक्षण मिळावं म्हणून सरकारकडून बुस्टर डोजचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, ६० वर्षांपुढील नागरिक यांनाच बुस्टर डोज देण्यास परवानगी दिली होती.

Related Stories

No stories found.