"गोमांस खाण्यात काहीच वाईट नाही, हे सावरकरांनी पुस्तकात लिहिलंय"

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचं हिंदुत्वावरून भाजपवर टीकास्त्र : 'हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही'
"गोमांस खाण्यात काहीच वाईट नाही, हे सावरकरांनी पुस्तकात लिहिलंय"

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ देत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या पुस्तकात लिहलं आहे की, गाय असा पशु आहे, जो स्वतःच्या विष्ठेमध्ये बसते, ती कशी आपली माता असेल", असं म्हणत दिग्विजय सिंह यांनी भाजप आणि आरएसएसवर टीकास्त्र डागलं आहे.

भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तुळसीनगर येथील नर्मदा मंदिर भवनात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना सिंह यांनी सावरकरांच्या पुस्तकातील काही मुद्दे मांडत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केलं. सिहं म्हणाले, 'सावरकरांनी पुस्तका लिहिलेलं आहे की, गोमांस खाण्यात काहीच वाईट नाही. भाजप आणि संघाचे महत्त्वाचे विचारक असलेल्या सावरकरांनी हे म्हटलेलं आहे.'

पुढे बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले, "आपला लढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात आहे. संपूर्ण देशाचं धुव्रीकरण करत असलेल्या त्या विचारधारेसोबत आहे," असंही सिंह यांनी सांगितलं.

दिग्विजय सिंह यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून उत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे खासदार रामेश्वर शर्मा यांनी सावरकरांचा संदर्भ देत केलेल्या विधानावर टीका केली आहे. 'दिग्विजय सिंह दिवसरात्र फक्त हिंदुंना बदनाम करण्याचं काम करत असतात.'

'दिग्विजय सिंह असे महापुरुष आहेत जे हिंदुंच्या विरोधात दिवसरात्र कटकारस्थान करण्याचं काम करत असतात. त्यांनी हिंदू आणि हिंदुस्थानच्या भल्यासाठी काम केलं असतं, तर ना जिन्ना जन्माला आले असते, ना देशात कुठेही दहशतवाद दिसला नसता. हिंदू धर्मात काय उणिवा आहेत आणि हिंदू धर्माला कसं बदनाम करता येईल, यातच दिग्विजय सिंह मग्न असतात. कधी सावरकरांच्या नावावर, तर कधी इतर कुठल्या महापुरुषाच्या नावावर दिग्विजय सिंह चुकीची विधान करत असतात," असं आमदार शर्मा यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in