
पटना (बिहार): बिहारमधील पटना शहरातील मालसलामी पोलीस स्टेशन परिसरातून एक खळबळजनक घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. फक्त अवघ्या काही पैशासाठी स्वत:च्या आईविरुद्ध कट रचणाऱ्या मुलाने आपल्या पत्नीच्या साथीने एक भयंकर गोष्ट केली. ज्यामुळे आई-मुलाच्या नात्याला देखील काळीमा फासला गेला.
लालसेपोटी सून आणि मुलाने आपल्याच आईविरुद्ध एक असा कट रचला की, ज्याची माहिती मिळताच पोलिसांचेही धाबे दणाणले. हे प्रकरण तब्बल 17 लाखांच्या दरोड्याशी संबंधित आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालसलामी पोलीस स्टेशन हद्दीतील चुटकिया बाजार येथे राहणारी गिरिजा देवी ही वृद्ध महिला आपली सून शोभा राणी आणि मुलीसोबत जमिनीचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी जात होती.
याचवेळी भैसानी टोला मोहल्ला येथे असलेल्या त्याच्या दुसऱ्या मुलाच्या घराजवळ तीन तरुण अचानक त्यांच्यासमोर आले. आणि काही कळायच्या आतच त्यांनी हवेत गोळीबार करत 17 लाख रुपये असलेली बॅग महिलेच्या हातून हिसकावली आणि तिथून तात्काळ पळ काढला.
महिलेजवळचे पैसे लुटून आरोपी फरार झाले होते. त्यामळे आपलं नशीबच खोटं असं म्हणत गिरीजा देवी याबाबत गप्पच राहिल्या होत्या. पण जेव्हा पोलिसांनी या लुटपाटीचा संपूर्ण प्रकार उघड केल्यावर गिरीजा देवी यांना प्रचंड धक्का बसला.
पीडित गिरिजा देवी यांनी या घटनेबाबत सांगितले की, नुकतेच तिने पीरबाहोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नटराज गल्ली येथील आपले जुने घर विकले होते. याच पैशातून त्यांनी दुसरीकडे एक नवीन घर घेतलं होतं. त्याचेच काही पैसे त्यांना द्यायचे होते. नव्या घरमालकाला त्यांनी 13 लाख दिले होते. उरलेले 17 लाख रुपये त्याला द्यायचे होते.
गिरिजा देवी यांनी सांगितले की, नवीन घरमालकाने त्यांना ड्राफ्टमध्ये पेमेंट देण्यास सांगितलं होतं. त्यामुळेच 17 लाख रुपये घेऊन त्या बँकेत ड्राफ्ट बनविण्यासाठी जात होत्या. त्यामुळे त्या हे पैसे घेऊन आपला मुलगा विष्णूकुमारच्या घरी आल्या होत्या. तिथून त्या त्यांची सून शोभा राणी हिच्यासोबत बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होत्या. त्याचदरम्यान, चोरट्यांनी त्यांचे लाखो रुपये पळवले.
आरोपी सून आणि मुलाला अटक
पटना शहराचे डीएसपी अमित शरण यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि सांगितले की, मुलगा आणि सुनेने अज्ञात गुन्हेगारांच्या मदतीने दरोडा टाकण्याचा कट रचला होता. डीएसपी म्हणाले की, हे प्रकरण उघडकीस येताच आरोपी सून आणि मुलाला अटक करण्यात आली आहे, पण नातू मात्र फरार आहे. तसेच ज्या आरोपींनी पैसे पळवले त्यांचा देखील सध्या शोध सुरु आहे.