
सातारा: शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. असं आमदार महेश शिंदे यांनी विधान केलं होतं. ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे.
शशिकांत शिंदे आमदार महेश शिंदेंवर संतापले, पाहा नेमकं काय-काय म्हणाले:
'ज्या विषयातली तुम्हाला माहिती नाही, त्यावर आपण बोलू नये. शरद पवार यांनी ही संस्था चांगली सांभाळली आहे. तसेच या संस्थेचे सर्व संचालक वेगवेगळ्या क्षेत्रातील मात्तबर व्यक्ती आहेत. रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रात विखुरली गेली आहे आणि या संस्थेकरीता सर्व क्षेत्रातील जाणकार मात्तब्बर संचालक चांगलं काम करताना पहायला मिळत आहे.
'कोरोना काळात सुद्धा संस्थेला अडचणी येऊ नयेत म्हणून संस्थेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा करुन संस्थेचं काम पवारसाहेबांनी थांबू दिलं नाही. येवढं मोठं काम शरद पवार साहेब करत असताना महेश शिंदे यांनी असे आरोप करणं योग्य नाही.'
'कर्मवीर आण्णांच्या विचारांना मूर्त स्वरुप देण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे स्पर्धेच्या युगात आधुनिक प्रकारची टेक्नॉलॉजी वापरुन संस्थेला स्पर्धेत टिकवण्याचं काम शरद पवार करत आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा विषय आत्ताच का निघाला या सर्वांच्या पाठीमागे कोण आहे हे बघितलं पाहिजे.'
'शरद पवारांच्यावर टीका करत असताना स्वत:ची उंची पहावी ज्यांना शिक्षणाबद्दल आणि पवार साहेबांबद्दल माहिती नाही त्यांनी अशी टिका करु नये. पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.' असं म्हणत आमदार शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
'सर्व शिक्षक आणि संचालकांनी रयतच्या शिक्षणाचा दर्जा राखल्यामुळेच संस्थेत शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालक सतत धडपडत असतात. रयतमधील नोकर भरतीवेळी पैसे घेत जात असल्याचा आरोप हा बिनबुडाचा आहे.'
'महेश शिंदे यांचे वडील रयत सेवक होते आणि स्वत: सुद्धा त्यांनी याच संस्थेत शिक्षण घेतलं आहे. असं ते सांगतायेत मग, असं असताना त्यांनी संस्थेला बदनाम करणं याच्या पाठीमागे कोणतं षड्यंत्र आहे याचा तपास केला पाहिजे.' असंही शशिकांत शिंदे म्हणाले.
'महेश शिंदे यांचा राजकारणातील जन्मच पवार साहेबांमुळं झाला आहे. त्यांनी हे त्यांनी विसरु नये. पवार साहेबांवर टीका करत असताना त्यांनी अनेक वेळा विचार करुनच बोलावं.' असा इशाराही शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.