सध्याचं जग हे तंत्रज्ञानाचं जग मानलं जातं. या जगात गुन्हेगारही आपल्या सावजाला जाळ्यात अडकवण्यासाठी अनोख्या युक्त्या वापरताना दिसतात. औरंगाबादमध्ये सायबर चोराने केलेल्या एका अशाच प्रतापामुळे एका ग्राहकाची फसवणूक झाली आहे. ३०० रुपयांची जेवणाची थाळी या ग्राहकाला लाखांच्या घरात पडली आहे.
फेसबुकवर शाही भोज थाळीच्या बाय वन गेट टू फ्री या ऑफरला भुलून बाळासाहेब ठोंबरे या शेतकऱ्याने बुकींगसाठी दिलेल्या नंबरवर फोन केला. यावेळी फोनवरुन ऑर्डर देणं त्यांना चांगलंच महागात पडलंय. समोरील व्यक्तीने बुकींग फक्त ऑनलाईन होतं असं सांगितलं ज्यावर ठोंबरे यांचा विश्वास बसला. यानंतर ठोंबरे यांनी स्वतःच्या क्रेडीट कार्डाची माहिती दिली. यानंतर आरोपीने मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला असता ठोंबरेंनी त्यांना ओटीपी सांगितला. ज्यानंतर ३०० रुपयांऐवजी त्यांच्या खात्यातून ९८ हजार ८९० रुपये काढण्यात आले.
ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्यांच्याकडून तुमचं पेमेंट आलेलं नाही पुन्हा एकदा ओटीपी सांगा अशी विनंती केल्यानंतर त्यांना हा आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान सायबर पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून घेतली असून तपास सुरु आहे.
दरम्यान आरोपीने याआधीही औरंगाबादमधील भोज रेस्टॉरंटच्या नावाने फेसबूकर खोटी जाहीरात देऊन अनेकांना फसवलं होतं. ही बाब लक्षात आल्यानंतर रेस्टॉरंटच्या मालकांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतू कालांतराने या आरोपीने पुन्हा एकदा नवीन फोन आणि आयपी अॅड्रेसच्या सहाय्याने लोकांना फसवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पोलीस आरोपीचा शोध घेत असून त्यांनी नागरिकांना अशा भूलथापांना बळी पडून आपली गोपनीय माहिती आणि ओटीपी शेअर न करण्याचं आवाहन केलं आहे.