उद्योगविश्वावर शोककळा : टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन

मिस्त्री हे 2012 ते 2016 या काळात टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष होते.
Cyrus Pallonji Mistry
Cyrus Pallonji Mistry Mumbai Tak

पालघर : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. रविवारी 9 सप्टेंबरला दुपारी पालघरजवळील चारोटी गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात मिस्त्रींसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले.

अपघात कशामुळे झाला?

पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी 'मुंबई तक'ला दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान अहमदाबाद-मुंबई महामार्गावरून मर्सिडीज गाडीने (MH-47-AB-6705) मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. तेव्हा सुर्या नदीच्या पुलावर त्यांची गाडी डिव्हायडरला धडकली. अपघात एवढा भीषण होता की मिस्त्री यांच्यासह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातातील 2 जखमींना उपचारासाठी आधी घटनास्थळाजवळील कासा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गुजरातला हलविण्यात आलं आहे. गाडी नेमकी डिव्हायडरला कशी धडकली, हा नेमका अपघात होता की घातपात याचा पुढील तपास सुरु आहे, अशीही माहिती पाटील यांनी दिली.

कोण होते सायरस मिस्त्री?

मिस्त्री हे 2012 ते 2016 या काळात टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष होते. नंतर रतन टाटा आणि मिस्त्री यांच्यात वाद झाला. टाटा यांना मिस्त्री यांची काम करण्याची पद्धत आवडली नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर मिस्त्री यांनी यावर आक्षेप घेत न्यायालयात देखील धाव घेतली होती. मिस्त्री यांच्यानंतर पुन्हा एकदा रतन टाटा यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली होती.

मिस्त्री यांच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करुन मिस्त्री यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. “टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचं वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नाही, तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाल्याच म्हटलं. तसंच कुटुंबियांच्या दुःखात सोबत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून मोठा भाऊ गमावल्याची भावना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in