भाजप पक्ष जातीयवादी पक्ष असून त्यांच्या रक्तातच मुस्लीम बांधवांबद्दल विष आहे. जातीयवादी भाजप पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे, असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी भाजपवर घणाघात केलाय. भरणे आज इंदापूर दौऱ्यावर होते यावेळी इंदापूर शहरातल्या या कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी थेट भाजपवर हल्ला चढवला.
अमरावती हिंसाचारामागे भाजप, मुंबईहून पाठवण्यात आले पैसे-नवाब मलिक
काय म्हणाले दत्तात्रय भरणे?
‘काहीही झाले तरी मुस्लिम बांधवांवर काही पक्षाचे प्रमुख ठपका ठेवतात. शेवटी मुस्लिम असो किंवा हिंदू रक्त एकच आहे ना ? आज जे दंगे चालले आहेत त्यापाठीमागे मोठे षडयंत्र आहे. मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या कुटुंबाला एका विशिष्ट आडनांव आहे म्हणून त्याला टार्गेट केले जाते. ज्याच्या रक्तातचं मुस्लिमांबद्दल विष आहे अशा भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे, असा घणाघात सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.
इंदापूर तालुक्यात आम्ही कधी हिंदू आणि मुस्लिम असे मानत नाही. आपण एकमेकांवर भावासारखे प्रेम करतो. परंतु काही पक्षाचे नेते मंडळी मतासाठी जातीपातीचे विष पेरतात. असं भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला.
काय आहे प्रकरण?
त्रिपुरा येथील मशिदीच्या कथित विटंबनाप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पहायला मिळाले. राज्यात अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी दंगल घडल्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खबरदारीचा उपाय म्हणून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भातले आदेश जाहीर केले. त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. ज्यात सरकारी मालमत्तेसह पोलिसांच्या गाड्यांची आंदोलनकर्त्यांनी तोडफोड केली होती. अमरावती शहरात प्रशासनाने संचारबंदी लागू केली असून तिकडे सध्या तणावपूर्ण शांतता आहे.