
मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सध्या अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याने त्यांच्या विरोधात जो गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे तो रद्द व्हावा अशी याचिका कोर्टात केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
'दुसऱ्याच्या घरात हनुमान चालीसा वाचणं हा त्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग आहे.' असं म्हणत हायकोर्टाने राणा दाम्पत्याला चांगलंच झापलं आहे.
हायकोर्टाने जी याचिका दाखल केली होती त्यामध्ये राणा दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. कारण राणा दाम्पत्याविरोधात 353 चा जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की, सरकारी कामात अडथळा आणला जात होता. हाच आरोप ठेवत एफआयआर दाखल करण्यात आला होता.
एफआयआर यासाठी नोंदविण्यात आला आहे की, समजा एका प्रकरणात त्यांना जामीन जरी मिळाला तरी लगेच त्यांना दुसऱ्या प्रकरणात अटक करता येते. अशा स्वरुपाचा आरोप राणा दाम्पत्याकडून करण्यात आला आहे.
राणा दाम्पत्यांच्या वकिलांचा युक्तीवाद
दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. यावेळी राणा दाम्पत्याच्य वकिलांनी असं म्हटलं की, 'हे दोन्ही FIR एकच आहेत. फक्त 353 साठी तुम्ही दुसरा एफआयआर का करता आहात? पण तुम्ही जाणूनबाजून दुसरा एफआयआर दाखल केला.' असा आरोप त्यांनी केला.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी काय केला युक्तीवाद
दुसरीकडे, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हे आरोपींच्या वकिलांचं म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न करताना आपल्या युक्तीवादात असं म्हटलं आहे की, 'या दोन्ही वेगवेगळ्या FIR या दोन वेगवेगळ्या दिवशी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दुसरा एफआयआर हा सरकारी कामात अडथळा आणण्याबाबत दाखल करण्यात आला होता. पोलीस हे वारंवार राणा दाम्पत्याला सांगत होते की, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये चला.
कोर्टाने राणा दाम्पत्याला झापलं
न्यायमूर्ती व्हराळे आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या खंडपीठाने याबाबत निकाल देताना असं म्हटलं आहे की, सरकारी वकिलांनी जे मुद्दे मांडले आहेत. ते बरोबर आहेत. तुम्हाला हनुमान चालीसा वाचायचा आहे ते आम्ही समजू शकतो. पण ते दुसऱ्याच्या घरसमोर कशासाठी?
तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा करता तेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा भंग होतो. ही गोष्ट काही बरोबर नाही. तुम्हाला चौकशीसाठी बोलावलं तुम्ही गेला नाहीत. त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी कोर्टाने पोलिसांना असं म्हटलं आहे की, राणांना तुम्हाला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करायची असेल तर त्यांना 72 तासांची नोटीस द्यावी लागणार आहे. पण असं असलं तरीही एफआयआर चुकीचा नाही. असं कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.
एखादी व्यक्ती दुसर्या व्यक्तीच्या वैयक्तिक निवासस्थानी किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी काही धार्मिक श्लोकांचे पठण करेल अशी घोषणा ही प्रथमतः दुसर्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग आहे.
दुसरं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर एखाद्या विशिष्ट धार्मिक श्लोकाचे पठण केले जाईल अशी घोषणा केली गेली तर अशा कृत्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी भीती बाळगणे ही राज्य सरकारची न्याय्य बाब आहे. असं म्हणत कोर्टाने राणा दाम्पत्याला खूपच झापलं आहे.