"उद्या म्हणाल गुजरात आणि महाराष्ट्राचं विलिनीकरण करायचं"

MCD polls : महापालिका निवडणुकीवरून दिल्लीत राजकारण तापलं; केजरीवालांनी भाजपला दिलं चॅलेंज
"उद्या म्हणाल गुजरात आणि महाराष्ट्राचं विलिनीकरण करायचं"

दिल्लीतही आता महापालिका निवडणुकीवरून जोरदार राजकारण रंगताना दिसत आहे. दिल्लीतील तिन्ही महापालिकांचं विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, या निर्णयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. त्याचबरोबर केजरीवालांनी आप राजकारणातून बाहेर पडेल, असं विधानही केलं आहे.

शहीद दिनानिमित्त बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, "मागील काही दिवसांपासून जे काही बघायला मिळत आहे, तो एक प्रकारे शहिदांच्या बलिदानाचा अपमानच आहे. केंद्रातील भाजप सरकार दिल्ली महापालिकेची निवडणूक टाळत आहे. सगळ्यांना माहितीये की, यावेळी भाजपची सफाई होणार होती आणि पराभव टाळण्यासाठी त्यांनी आधी राज्य निवडणूक आयोगावर दबाव आणला. आता दुरुस्ती करत आहे. यामाध्यमातून निवडणूक काही महिन्यांसाठी टाळली जात आहे," असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

"जर देशात निवडणुकाच झाल्या नाही, तर लोकशाही कशी टिकेल. जनतेचा आवाज कसा टिकेल. आजच्या दिवशी सर्वात जास्त दुःख भगतसिंगांच्या आत्म्याला होत असेल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते स्वतः फासावर गेले. त्यांनी या दिवसासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं होत का की, सरकार येईल आणि निवडणूकच बंद करेल", अशी टीका केजरीवाल यांनी केली.

"विजय-पराभव होतच राहतो. आज एका राज्यात तुम्ही जिंकता, दुसऱ्या राज्यात दुसरं कुणीतरी जिंकतं. एका छोट्या महापालिकेत होणाऱ्या पराभवाच्या भीतीने संविधानाशी खेळू नका. आज सांगत आहेत की, तिन्ही महापालिकांचं विलीनीकरण करत आहोत, त्यामुळे निवडणूका पुढे ढकलत आहोत. या कारणासाठी निवडणूका पुढे ढकलल्या जाऊ शकतात का? उद्या गुजरातमध्ये निवडणूका लागल्यानंतर हे केंद्रीय निवडणूक आयोगाला चिठ्ठी लिहितील की आम्ही गुजरात आणि महाराष्ट्राचं विलिनीकरण करत आहोत. त्यामुळे गुजरातची निवडणूक घेऊ नका. लोकसभेच्या निवडणुकीवेळी म्हणतील आम्ही संसदीय पद्धत बंद करून अध्यक्षीय पद्धत आणत आहोत. निवडणुका नका घेऊ", अशा शब्दात केजरीवालांनी भाजपवर निशाणा साधला.

"मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की, उद्या भाजप वा आम आदमी पक्ष राहतील वा राहणार नाही. मोदी किंवा केजरीवाल राहतील वा राहणार नाही, पण देश वाचला पाहिजे. एका छोटी निवडणूक जिंकण्यासाठी या देशाच्या व्यवस्थेशी छेडछाड करू नका."

"भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष मानते. सर्वात मोठा पक्ष दिल्लीतील एका छोट्या निवडणुकीला घाबरला आहे. दिल्लीतील एका छोट्या निवडणुकीला घाबरले आहेत. तुमची कीव येते. तुमच्या हिंमत आहे का? मी भाजपला आव्हान देतो. हिंमत असेल, तर एमसीडी निवडणूक वेळेवर घेऊन दाखवा आणि जिंकून दाखवा, आम्ही राजकारण सोडून देऊ", असं आव्हान केजरीवालांनी भाजपला दिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in