Drugs Case : दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, मलिकांचे पुरावे पवारांना देणार -देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मलिकांवर पलटवार : मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा
Drugs Case : दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, 
मलिकांचे पुरावे पवारांना देणार -देवेंद्र फडणवीस
शरद पवार, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस.BJP, NCP/Twitter

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असून, त्यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू असल्याचा आरोप केला. मलिक यांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी लगेच उत्तर दिलं. त्याचबरोबर मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध सर्वांसमोर आणणार असल्याचा इशारा दिला.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, 'दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आवाज नवाब मलिक आणत आहेत. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. जो फोटो त्यांनी ट्वीट केला आहे, त्याबद्दल रिव्हर मार्चच्या लोकांनी त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. ती व्यक्ती क्रिएटिव्ह टीमने हायर केलेली होती, असं त्यांनी म्हटलेलं आहे. चार वर्षांपूर्वीचा फोटो आज सापडला आहे', असं फडणवीस यावेळी म्हणाले.

'ही संघटना नदी पुर्नज्जीवनासाठी काम करतात. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी जोडलो गेलो होतो. त्यावेळी हे फोटो काढलेले आहेत. सगळ्यांसोबत फोटो काढलेले आहेत. मलिक यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. यापाठीमागे त्यांची मानसिकता स्पष्टपणे दिसत आहे. यासंदर्भात रिव्हर मार्चवाल्यांनीच त्याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते लोक रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले होते. त्यांच्याशी आमचा दुरान्वयानेही संबंध नाही', असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

शरद पवार, नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस.
राज्यात ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरून; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

'भाजपचं ड्रग्ज कनेक्शन असं नवाब मलिक म्हणाले आहेत. मग मलिकांचे जावई ड्रग्जसह सापडले आहेत. मग मलिकांचं सूत्र लावलं तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ड्रग्ज माफिया झाली पाहिजे. कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्यामुळे जर कुणी ड्रग्ज माफिया होत असेल, तर ज्या घरी ड्रग्ज सापडतात त्यांची पार्टी काय होणार आहे? नवाब मलिकांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे. आता मलिकांनी लक्षात ठेवावं दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार', असा इशारा फडणवीस यांनी मलिकांना दिला आहे.

'मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत, अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये. ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. यासंबंधातले पुरावे माध्यमांसमोर मांडेन. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील पाठवणार आहे. दिवाळी संपण्याची वाट बघा. त्यांनी सुरूवात केलीये. याला अंतापर्यंत न्यावेच लागेल. या संपूर्ण प्रकरणात जावयाचं आरोपपत्र कुमकुवत व्हावी. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दबावात येऊन जावयाला संपूर्ण प्रकरणातून सुटण्यासाठी मदत करावी म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत. मला वाटतं कायदा सक्षम आहे आणि कायदा कायद्याचं काम करेल', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in