'शरद पवार सलग पाच वर्षे एकदाही मुख्यमंत्री राहिले नाहीत'; पवारांना फडणवीसांची कोपरखळी

देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना खास शैलीत उत्तर
'शरद पवार सलग पाच वर्षे एकदाही मुख्यमंत्री राहिले नाहीत'; पवारांना फडणवीसांची कोपरखळी

शरद पवारांची पत्रकार परिषद नेमकी कशासाठी तेच मला समजलं नाही, इतक्या विषयांवर ते आज बोलले असं म्हणत त्यांच्या प्रत्येक आरोपाला आज देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातून उत्तर दिलं आहे. मला अजूनही असं वाटतं की मुख्यमंत्रीच आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर शरद पवारांनी त्यावर टीका केली आणि खडे बोल सुनावले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या खास शैलीत आणि हसत हसत या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

'शरद पवार सलग पाच वर्षे एकदाही मुख्यमंत्री राहिले नाहीत'; पवारांना फडणवीसांची कोपरखळी
NCB, ED, CBI, IT या तपास यंत्रणांचा मोदी सरकारकडून सातत्याने गैरवापर-शरद पवार

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. चाळीस वर्षांनी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री मी राहिलो. शरद पवार हे मोठेच नेते आहेत. ते चारवेळा मुख्यमंत्री झाले पण एकदाही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. राहिले असते तर बरंच झालं असतं. त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे कधी दोन वर्षे, कधी दीड वर्ष असा कार्यकाळच ते मुख्यमंत्री राहू शकले. पण मला एका गोष्टीचं या ठिकाणी समाधान आहे की मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील समाधानी आहे हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झाली आहे.'

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस(फाईल फोटो)

काय म्हणाले शरद पवार?

'देवेंद्र फडणवीस यांचं भाषण मी ऐकलं. ते म्हणाले मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर आपण सत्तेत आहोत याचं स्मरण ठेवणं ही चांगली गोष्ट होतं. मी चारवेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, पण माझ्या कधी लक्षात राहिलं नाही. पाच वर्षे सत्तेत राहूनही आपण सत्तेत आहोत असं फडणवीसांना वाटतं ही चांगली आणि जमेची गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. ही कमतरता आमच्यामध्ये आहे. मी चारवेळा मुख्यमंत्री झालो पण माझ्या लक्षातही नाही. ' असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली होती.

एवढंच नाही तर शरद पवार पुढे म्हणाले की, 'मी असं कधी म्हटलं नव्हतं मी पुन्हा येईन, मी येणार. मी पुन्हा येईन अशी भाषा मी केली नव्हती. पण देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हापासून आत्तापर्यंत सत्ता गेल्याची वेदना किती खोलवर आहे हेच दाखवून दिलं आहे. सत्ता येते, जाते त्याचा फारसा विचार करायचा नसतो. सत्ता असताना समंजसपणाने सत्तेचा वापर हा लोकांच्या आणि राज्याच्या भल्यासाठी करायचा असतो.' असंही शरद पवार म्हणाले.

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शरद पवार इतक्या वेगवेगळ्या विषयांवर बोलले की कळलंच नाही पत्रकार परिषद कशाबाबत होती. शरद पवार यांनी लखीमपूरच्या घटनेचा उल्लेख केला. केंद्र सरकारवर टीका केली आणि मावळचा गोळीबार पोलिसांनी केला होता असं वक्तव्य केलं. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो जालियनवाला बागमध्ये गोळीबार कऱण्यासाठी ब्रिटिशांचे गव्हर्नर जनरल गेले नव्हते तर पोलीसच गेले होते. त्यामुळे मावळचा गोळीबार हा जालियनवालाबागसारखा होता असं आम्ही म्हणतो कारण तिथे राज्यकर्त्यांना जायची गरज नव्हती. आदेश कुणी दिले पोलिसांना?

सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की उत्तर प्रदेशात जी घटना घडते त्यासाठी इथे तुम्ही बंद करता. इथे तुम्ही धुडगूस घालता, इथे हिंसा होते. पहिल्यांदा मी असं पाहिलं की पोलीस संरक्षणामध्ये राज्यकर्ते लोकांवर दबाव टाकत आहेत, त्यांना बंद करायला भाग पाडत आहेत. हे कुठलं राज्य आहे असा प्रश्न पडला. शिवसेना असूनही शांततेतही बंद झाला असं पवारांनीच सांगितलं ही समाधानाची गोष्ट आहे असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. रोज सोशल मीडियावर जे व्हीडिओ येत आहेत त्यावरून समजतंच आहे की बंद किती शांततेत पार पडला. हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद होता असं माझं मत आहे.

अनिल देशमुख यांच्यावर जी कारवाई झाली ती माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली आहे. हायकोर्टाने यासंदर्भात सीबीआय चौकशीचा निर्णय दिला आहे. ज्यांनी महाराष्ट्राचे आणि देशाचे पैसे बुडवले अशी 80 बँक फ्रॉडची प्रकरणही सीबीआयला महाराष्ट्राने संमती न दिल्याने धूळ खात पडून आहेत. ज्या प्रकारे या ठिकाणी या संस्थाना वागणूक दिली जाते आहे ती देखील चुकीची आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.