11500 कोटींच्या Flood Relief Package बाबत देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

जाणून घ्या काय म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी ?
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस(फाइल फोटो, सौजन्य - Twitter)

योगेश पांडे, प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांसाठी 11500 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. महाराष्ट्रात पूर, पाऊस यांनी दाणादाण उडवली. या सगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौराही केला. त्यानंतर कॅबिनेटची मिटिंग मंगळवारी बोलवण्यात आली होती. या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि ती राज्य सरकारने वास्तवात आणली. पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज सरकारने जाहीर केलं आहे. याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणासह राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने 11,500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असली तरी याचे विश्लेषण पाहता केवळ 1500 कोटी रूपयांचीच तातडीची मदत केलेली दिसून येते. पुनर्बांधणीचे 3000 कोटी आणि सौम्यीकरण उपाययोजनांचे 7000 कोटी असे 10 हजार कोटी रुपये हे दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये मोडतात. त्यामुळे प्रत्यक्ष मदत ही 1500 कोटी रुपयांचीच दिसून येते. राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाचे अवलोकन केले असता शेतीपिकांचे नुकसान, अन्नधान्य पुरवठा, स्वच्छता अनुदान, घरांसाठी वाळू-मुरूमची उपलब्धता अशा 2019 मध्ये देण्यात आलेल्या अनेक मदतींचा त्यात उल्लेख दिसून येत नाही. या मदतीबाबतचा विस्तृत शासन आदेश जारी झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता आल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देता येईल. प्रथमदर्शनी तरी शेतकर्‍यांसारख्या महत्त्वाच्या घटकाला कुठलीही मदत केलेली दिसून येत नाही.

राज्य सरकारने जाहीर केली मदत कशी मिळणार?

सानुग्रह अनुदान म्हणून प्रति कुटुंबाला NDRF च्या निकषांच्या पुढे जाऊन 10 हजार रूपयांची मदत. दुकानदारांसाठी 50 हजार रूपये तर टपरी धारकांसाठी 10 हजारांची मदत जाहीर.

संपूर्ण घर पडलं असल्यास 1 लाख 50 हजार रूपये, 50 टक्के नुकसान झालं असल्यास 50 हजार रूपये आणि 25 टक्के नुकसान झालं असल्यास 25 टक्के अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी किमान 15 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

शेती नुकसानाचा प्राथमिक अंदाज आला आहे. प्राथमिक माहितीनुसार 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. मत्स्य व्यवसाय, एमएसईबी विभागाचं, ग्रामीण विकास या भागांसाठीही मदत केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 2500 कोटी रुपये, नगर विकास विभागानं दिलेल्या नुकसानाचाही या एकूण पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(फोटो सौजन्य- PTI)

या निर्णयांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे. 2 लाख कुटुंबांना मायनस खात्यांमधून आम्ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानं आणि टपऱ्यांची संख्या 16 हजार आहे. याशिवाय, खरडून गेलेली शेतजमीन 30 हजार हेक्टर आहे. त्यासाठीच्या एनडीआरएफच्या निकषांमध्ये अधिकचे पैसे टाकून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बागायती, जिरायतीसाठी सविस्तर निर्णय जाहीर करण्यात येतील. 4 हजार 400 प्राण्यांचा या आपत्तीमध्ये मृत्यू झाला आहे. त्यासाठी 60 कोटींची वेगळी रक्कम जाहीर करण्यात आली आहे.

नुकसान भरपाईसोबतच मृतांच्या नातेवाईकांसाठी देखील आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एसडीआरएफच्या निकषांनुसार 4 लाख रुपये, मुख्यमंत्री रिलीफ फंडमधून 1 लाख रुपये, ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशा शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा रकमेतून 2 लाख रुपये, तर पंतप्रधानांनी जाहीर केलेले 2 लाख रुपये अशी आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in