Aryan Khan ला ड्रग्ज पार्टी प्रकरणात गोवण्यात आलंय, साक्षीदार विजय पगारेचा धक्कादायक खुलासा

सुनील पाटील-मनिष भानुशाली आणि गोसावी यांच्यात छापेमारीआधी अनेकदा बैठका झाल्याची माहिती
Aryan Khan ला ड्रग्ज पार्टी प्रकरणात गोवण्यात आलंय, साक्षीदार विजय पगारेचा धक्कादायक खुलासा
पगारे यांनी दिलेल्या साक्षीमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.

NCB ने आर्यन खानवर केलेल्या कारवाईत आता प्रत्येक दिवशी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता विजय पगारे नावाचा एक साक्षीदार समोर आला असून त्याने मुंबई पोलिसांच्या SIT समोर महत्वाचा जबाब नोंदवला आहे. क्रुझवर छापेमारी करुन आर्यन खानला त्यात अडकवून पैसे वसूल करण्याची योजना आखण्यात आली होती असा धक्कादायक दावा विजय पगारे यांनी केला आहे.

क्रुझवर छापेमारी करण्याआधी मनिष भानुशाली, सॅम डिसुझा, के.पी. गोसावी आणि सुनील पाटील यांच्यात अनेकदा मिटींग झाल्याचीही माहिती पगारे यांनी दिली आहे. भाजप नेते मोहीत कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सुनील पाटील यांच्या नावाचा गौप्यस्फोट करत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोप केला होता.

पगारे हे मुळचे धुळ्याचे रहिवासी असून ते गेल्या काही महिन्यांपासून सुनील पाटील यांच्यासोबत राहत होते. पगारे यांनी पाटील यांना काही कारणासाठी पैसे दिले होते, हे पैसे वसूल करण्यासाठी ते सातत्याने पाटील यांच्या मागे लागले होते. वारंवार विनंती करुनही सुनील पाटील पैसे परत करण्यासाठी मुदतवाढ घेऊन टाळाटाळ करत असल्यामुळे पगारे यांनी सुनील पाटील यांच्यासोबत राहण्यास सुरुवात केली. सुनील पाटील यांच्यासोबत मी अहमदाबाद, सूरत आणि मुंबईत असल्याची माहिती पगारे यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिली. द ललित आणि नवी मुंबईतील फॉर्च्युन हॉटेलमध्ये आपण राहत होतो असेही पगारे यांनी सांगितलं.

२ ऑक्टोबरला क्रुझवर छापेमारी होण्याआधी २७ सप्टेंबरला सुनील पाटील हे नवी मुंबईतील फॉर्च्युन हॉटेलमध्ये राहत होते. या हॉटेलमध्ये एक खोली ही पाटील यांच्या नावाने तर एक खोली ही पगारेंच्या नावे बुक करण्यात आली होती. यावेळी मनिष भानुशाली हा २७ सप्टेंबरला फॉर्च्युन हॉटेलमध्ये आला आणि त्याने पाटील आणि गोसावी यांच्याशी भेट घेत, बडा काम हो गया असं सांगितलं. मनिष भानुषाली हा NCB ने केलेल्या छापेमारीत पंच म्हणून उपस्थित होता तसेच त्याचे भाजपशी संबंध आहेत. यानंतर भानुशालीने पाटील आणि गोसावी यांना आपल्याला अहमदाबादला निघावं लागणार असल्याचं सांगितलं, परंतू पगारेला आपल्यासोबत घेऊ नका असंही भानुशाली म्हणाला. त्यावेळी आपल्याला आपल्या पैशांशी संबंध असल्यामुळे त्या तिघांमध्ये नेमकं काय संभाषण सुरु होतं याचा अंदाज आला नसल्याचं पगारे यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.

पगारे यांनी दिलेल्या साक्षीमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
समीर वानखेडेंवरील आरोपाची चौकशी करणाऱ्या SIT ने नोंदवले आणखी दोन व्यक्तींचे जबाब

३ ऑक्टोबरला मनिष भानुशाली पगारे राहत असलेल्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये परत आला आणि त्याने पगारेंना माझ्यासोबत चला तुमचे पैसे तुम्हाला मिळतील असं सांगितलं. यानंतर दोघेही NCB च्या कार्यालयात आले. पगारेंनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीवरुन निघाल्यावर NCB ऑफिसला पोहचेपर्यंत गाडीत भानुशाली फोनवर कोणाशीतरी बोलत होता. त्यावेळी तो वारंवार पुजा, सॅम आणि मयुर यांची नावं घेत होता. त्यावेळी किरण गोसावीचा फोन बंद होता.

NCB ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी पाहिल्यानंतर पगारेंना आर्यन खानला NCB ने अटक केल्याचं कळलं. त्यावेळी पगारेंना वाटलं की आपल्याला ज्या पैशांबद्दल सांगितलं जात आहे ते या प्रकरणाशी संबंधित आहेत. यानंतर सुनील पाटीलने भानुशालीच्या फोनवर संपर्क साधून पगारेंना पुन्हा नवी मुंबईत फॉर्च्युन हॉटेलवर जायला सांगितलं. यानंतर भानुशालीला ठाण्याला सोडल्यानंतर पगारे ठाण्याला आपल्या मित्राच्या ऑफिसमध्ये गेले. यावेळी टीव्हीवर NCB ने केलेल्या कारवाईच्या बातम्या पाहताना पगारेंना किरण गोसावी आणि मनिष भानुशाली आर्यन खानला घेऊन येताना दिसले. याचवेळी पगारेंना ही कारवाई जाणूनबुजून करण्यात आल्याचा संशय आला. आपण ही माहिती आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांना देण्याचा प्रयत्न केला, कोर्टातही आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतू मानेशिंदेंनी याकडे लक्ष दिलं नाही असंही पगारे म्हणाले.

या प्रकरणातील आणखी एक महत्वाचा व्यक्ती सॅम डिसुझानेही आपण पाटील यांचा संपर्क NCB अधिकाऱ्यांशी करवून दिल्याचं सांगितलं होतं. पगारे यांनी ४ तारखेला मुंबई पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला आहे. पगारे यांनी दिलेल्या जबाबानुसार ते सुनील पाटील यांच्यासोबत द ललित या हॉटेलमध्ये राहिले आहेत. इथे सुनील पाटील यांच्या नावाने एक खोली बुक करण्यात आली होती. सुनील पाटीलने मला त्याच्या कामात लक्ष घालू नको असं सांगितलं होतं. सुनील पाटील यांच्या सर्व मिटींग याच हॉटेलमध्ये पार पडल्याचंही पगारे यांनी सांगितलं.

क्रुझवर छापेमारी करण्याआधी सुनील पाटीलने पगारे यांना आता मी तुमचे पैसे देऊ शकतो कारण माझ्याकडे एक काम आलं आहे असं सांगितलं. क्रुझवर छापेमारी होईपर्यंत आपल्याला या प्रकरणाची काहीही माहिती नव्हती. यानंतर आपल्याला मिळणारे पैसे या छापेमारीतून येणार असल्याचं आपल्याला लक्षात आल्याचंही पगारे म्हणाले. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in