
पेगासस कांड महाराष्ट्रात ही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगासस सॉफ्टवेअर च्या वापराच्या बातम्या ही येत होत्या कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का? असे प्रश्न विचारत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
DGIPR अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्त्रायल ला गेले? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले? परत येऊन अहवाल दिला का? पेगाससशी यांचा संबंध आहे का? निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणं आश्चर्यकारक व संशयास्पद आहे. कितीवेळा कोण अधिकारी इस्रायलला गेले? NSO बरोबर शासकीय मिटिंग झाल्या होत्या का? NSO शी कोणता पत्रव्यवहार झाला होता का? हे सर्व समोर आले पाहिजे. या अगोदर ही अशा चौकशीची मागणी करण्यात आली होती.मात्र तेव्हा चौकशी झाली नव्हती. आता पुन्हा एकदा मी ही मागणी करतो आहे की चौकशी झाली पाहिजे असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. देशात पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व भाजपशासित राज्य सरकारांना या कार्यपद्धतीवर काम करण्याचे निर्देश दिले असतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता आणि हेतू आहे असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
देशातील राजकीय वर्तुळात पेगासस स्पायवेअरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवाय, केंद्र सरकारवर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून यावरून निशाणा देखील साधला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणात उडी घेतल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हं आहेत. तर, आता महाराष्ट्राच्या राजकारणातही या मुद्द्याचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीस सरकारच्या काळातील घटनेचा उल्लेख करत, पेगासस कांड महाराष्ट्रातही झाले का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय, याची महाविकासआघाडी सरकारने चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे. त्यामुळे यावरून आता राज्यातील राजकारणातही आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात होणार असल्याचं दिसत आहे.
आज सकाळीच राहुल गांधी यांनी आम्हाला ठाऊक आहे ते तुमच्या फोनमध्ये काय वाचत आहेत. या आशयाचं एका ओळीचं ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. आता त्यापाठोपाठ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पेगासस स्पायवेअरचं महाराष्ट्रातल्या फोन टॅपिंगशी काही कनेक्शन आहे का? याचा तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे.