Diwali 2021 मलेशिया ते ब्रिटन! 'या' दहा देशांमध्येही उत्साहात साजरी होते दिवाळी

वाचा सविस्तर कोणत्या कोणत्या देशांमध्ये दिवाळी कशी साजरी होते?
Diwali 2021 मलेशिया ते ब्रिटन! 'या' दहा देशांमध्येही उत्साहात साजरी होते दिवाळी

दिवाळी हा आनंदाचा, उत्हासाचा सण. आनंदाचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव. हिंदू धर्माच्या काही पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले होते. त्यामुळे अयोध्येत लोकांनी पणत्या लावून, दिवे लावून उत्सव साजरा केला होता. मात्र दिवाळी फक्त भारतातच साजरी होत नाही. तर साता समुद्रापारही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा सण म्हणजेच दिव्यांचा उत्सव इतर देशांमध्येही साजरा केला जातो.

कोणत्या देशांमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा होतो जाणून घ्या..

फिजी-फिजी या देशात मोठ्या प्रमाणावर भारतीय आहेत. त्यामुळे या देशात अत्यंत उत्साहात आणि आनंदात दिवाळी साजरी केली जाते. लोक मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी करतात, एकमेकांना भेटतात आणि पार्टीही करतात. या काळात तिकडे शाळा कॉलेजेस बंद असतात.

इंडोनेशिया- इंडोनेशियात मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात, त्यामुळे या देशातही दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. भारतात ज्याप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते अगदी त्याच पद्धतीने इंडोनेशियात दिवाळी साजरी केली जाते.

मलेशिया- भारतापेक्षा वेगळ्या स्वरूपात मलेशियाला दिवाळी साजरी केली जाते. या देशात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीला हिरवी दिवाळीही म्हटलं जातं. या देशात साजरी होणारी दिवाळी भारतापेक्षा वेगळी असते. तेल लावून अंघोळ केली जाते, त्यानंतर विविध मंदिरात जाऊन पूजा केली जाते. मलेशियामध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आहे त्यामुळे मिठाई, गिफ्ट असं देऊन दिवाळी साजरी केली जाते.

मॉरिशस- तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल पण मॉरिशसमध्ये जी जनता आहे त्यातले 50 टक्के लोक हिंदू आहेत. त्यामुळे या देशातही दिवाळी अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते.

नेपाळ- दिवाळी नेपाळमध्येही साजरी होते. नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे. त्यामुळेच भारतात जशी दिवाळी साजरी केली जाते तशीच दिवाळी नेपाळमध्येही साजरी केली जाते. आपली घरं सजवणं, दिवे लावणं, एकमेकांना भेटून गिफ्ट देणं ही प्रथा नेपाळमध्येही आहे.

श्रीलंका- भारताप्रमाणेच श्रीलंकेतही मोठ्या प्रमाणावर हिंदू लोक राहतात. त्यामुळे या देशातही थाटामाटात दिवाळी साजरी केली जाते.

कॅनडा- कॅनडात मोठ्या प्रमाणावर पंजाबी लोक राहतात. त्यामुळे या देशातही उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते. कॅनडाला अनौपचारीकरित्या मिनी पंजाब असंही संबोधलं जातं. कॅनडाच्या संसदेतही पंजाबी बोलणारे लोक आहेत. त्यामुळे या ठिकाणीही अत्यंत उत्साहात आणि थाटात दिवाळी साजरी होते.

सिंगापूर- भारतानंतर कोणत्या देशात अत्यंत धुमधडाक्यात दिवाळी साजरी होत असेल तर तो देश म्हणजे सिंगापूर. दिवाळीची खास सजावट, रांगोळ्या आणि पार्टीज हे सगळं पाहण्यास मिळतं. सिंगापूरच्या लिटिल इंडिया भागात साजरी होणारी दिवाळीही अगदी खास असते.

युके.- युकेमधल्या अनेक शहरांमध्ये जसं की बर्मिंगहॅम, लीस्टेस्टर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी केली जाते. या भागात मोठ्या प्रमाणावर भारतीय राहतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी दिवाळी साजरी होते आहे.

त्रिनिनाद अँड टोबॅगो- त्रिनिनाद या द्विपावरही दिवाळी साजरी केली जाते. तसंच या ठिकाणी दिवाळीनिमित्त रामलीलाही साजरी केली जाते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in