'माजी मंत्री म्हणू नका... दोन-तीन दिवसात कळेल' चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'माजी मंत्री म्हणू नका... दोन-तीन दिवसात कळेल' चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य

माझा उल्लेख माजी मंत्री असा करू नका... असं वक्तव्य पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने राज्यात राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पुण्यातील देहूगाव या ठिकाणी एका खासगी दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील आले होते त्यावेळी त्यांनी हे सूचक वक्तव्य केलं.

माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचं सूत्रसंचालन करणारा व्यक्ती म्हणत होता. त्याने दोन-तीन वेळा तसा उल्लेख केला. त्यानंतर फित कापण्यासाठी जेव्हा चंद्रकांत पाटील आले तेव्हा म्हणाले माजी मंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका. दोन-तीन दिवसात काय ते कळेल. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय यावरून राज्यात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

संभाजी ब्रिगेडच्या पुरुषोत्तम खेडेकर यांनी भाजपशी युती हाच पर्याय असा लेख लिहिल्याने राज्याच्या राजकारणात आणखी काही वेगळं समीकरण पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मात्र चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. मविआने आणलेल्या राजकीय बेरोजगारीत चंद्रकांत पाटील यांनी कुडमुड्या ज्योतिषाचा धंदा सुरू केला आहे. नवनवीन चिठ्ठ्या टाकल्या की उत्साह टिकून राहतो. मविआ सरकार मजबूत असल्याने दादांचे राजकीय भविष्य अंधारात आहेच पण सगळ्या भविष्यवाण्याही खोट्या ठरत असल्याने धंद्यातही अंधारच दिसतो. असं खोचक ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे आणि चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिलं आहे.

2019 मध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात निवडणूक निकालानंतर काडीमोड झाला. हे दोन पक्ष एकत्र येऊन त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपद अर्ध-अर्ध वाटून घेण्यावरून या दोन पक्षांमध्ये काडीमोड झाला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. त्यादिवसापासूनच हे सरकार अंतर्विरोधाने पडेल असं भाजपचे नेते सांगत आहेत. मात्र सरकार स्थिर आहे. अशात आता चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य करून चर्चा घडवली आहे हे मात्र नक्की

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in