Exclusive : आर्यन खानला आता तुरुंगातलंच जेवण; सहा वाजताच उठावं लागणार... अशी असेल दिनचर्या

ड्र्ग्ज प्रकरणात आर्यनला न्यायालयीन कोठडी, स्पेशल ट्रिटमेंट नाही; ५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी
Exclusive : आर्यन खानला आता तुरुंगातलंच जेवण; सहा वाजताच उठावं लागणार... अशी असेल दिनचर्या

ड्रग्ज केस प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. आर्यनसह इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २ ऑक्टोबरला NCB ने मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवर छापेमारी करुन अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी काही जणांना अटक केली होती, ज्यात आर्यन खानचाही समावेश होता.

आर्थर रोड जेलमध्ये आर्यन खानला कोणतीही स्पेशल ट्रिटमेंट मिळणार नसून त्याला इतर कैद्यांप्रमाणेच रहावं लागणार आहे. मुंबई तक कडे आर्यन खानची आर्थर रोडमधली दिनचर्या कशी असेल याची माहिती आली आहे.

Exclusive : आर्यन खानला आता तुरुंगातलंच जेवण; सहा वाजताच उठावं लागणार... अशी असेल दिनचर्या
Drugs Case: आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयाने जामीन फेटाळला

आर्यन खान आणि इतर ५ आरोपींना जेलमध्ये बराक क्रमांक १ मध्ये ठेवण्यात येईल. ही बराक कोरोना काळात क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात येत असून ती जेलमध्ये पहिल्या मजल्यावर आहे. सध्याच्या घडीला आर्यन खानला जेलचा युनिफॉर्म मिळणार नाहीये. या बराकमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना ५ दिवस काढावे लागतील. जर त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळली तर त्यांची चाचणी केली जाईल. परंतू आर्यन आणि इतर ५ आरोपींची याआधीच कोरोना चाचणी झाली असून तिचा निकाल निगेटीव्ह आला आहे. या सर्व आरोपींनी लसीचे दोन डोस घेतल्यामुळे त्यांना या बराकमध्ये ५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागेल.

या आरोपींना इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळणार असून, त्यांना फक्त जेलमधलं खाणं मिळणार आहे. बाहेरील खाणं त्यांना मिळणार नाही. NCB कोठडीत असताना आर्यन खान आणि इतर आरोपींसाठी बाहेरच्या खाण्याची सोय करण्यात आली होती.

सर्व आरोपींची जेलमधली दिनचर्या अशी असेल -

१) जेलमधले अधिकारी सकाळी ६ वाजता सर्व कैद्यांना उठवतील.

२) सकाळी सात वाजेपर्यंत सर्वांना नाश्ता मिळेल, ज्यात शिरा-पोहे असतील.

३) सकाळी ११ वाजेपर्यंत जेवणं दिलं जाईल. दोन्ही वेळच्या जेवणात पोळी-भाजी आणि डाळ-भात हेच खाणं मिळेल.

४) दुपारचं जेवण झाल्यानंतर कैद्यांना बराकबाहेर फिरण्याची मुभा दिली जाते. परंतू आर्यन आणि इतर आरोपींना ५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण होईपर्यंत बाहेर येता येणार नाही.

५) जर आर्यन खान आणि इतरांना अधिकचं खाणं हवं असेल तर त्यांना ते जेलच्या कँटीनमधून विकत घ्यावं लागेल. त्यासाठीचे पैसे हे मनी ऑर्डरने मागवता येतील.

६) संध्याकाळचं जेवण हे ६ वाजेपर्यंत दिलं जाईल, अनेक कैदी हे जेवण रात्री ८ वाजता जेवतात.

यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्यन खानच्या वकीलांनी त्याला जामिन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. जरी आर्यन खानला जामिन मिळाला तरीही त्याची सर्व कागदपत्र ही आर्थर रोड जेलमध्ये संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत येणं गरजेचं आहे. सकाळी सहा वाजता उठणं आणि संध्याकाळी सहा वाजता जेलचं गेट बंद होणं ही सर्वात महत्वाची प्रक्रीया असल्याची माहिती जेल अधिकाऱ्यांनी दिली.

Related Stories

No stories found.