
योगेश पांडे, नागपूर: दारुड्या बापाने पैशासाठी पोटच्या मुलीला विकल्याची अत्यंत खळबळजनक घटना नागपुरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी दुर्गावती परिसरात घडली आहे. आरोपीने पत्नीला धमकावून स्वतःच्या एका महिन्याच्या मुलीची 70 हजार रुपयांमध्ये विकल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात अनाथालयात कार्यरत असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा देखील सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे.
नवजात मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून बाळ विकत घेणाऱ्या दाम्पत्याचा किती सहभाग आहे याचा देखील तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
भंडारा येथील उत्कर्ष दलीवले नामक इसम कामाच्या निमित्याने नागपूरच्या राणी दुर्गावती भागात स्थायिक झाला होता. दरम्यान गेल्या महिन्यात त्याच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना आरोपी उत्कर्ष दलीवलेने याने दारुचे व्यसन भागवण्यासाठी चक्क स्वतःचा मुलीला विक्रीसाठी काढले होते.
याची माहिती उषा सहारे नामक महिलेला समजली. तिने लागलीच उत्कषला संपर्क साधून उमरेड येथील एका दाम्पत्यासोबत मुलीच्या विक्रीचा सौदा केला. मात्र, उत्कर्षची पत्नी ईश्वरी याकरिता तयार नव्हती. ती सातत्याने विरोध करत होती. मात्र, उत्कर्षने तिचा विरोध न जुमानता बाळाला 70 हजार रुपयांमध्ये विकले.
मिळालेल्या, पैशातून त्याने घरात काही वस्तू विकत आणल्या. मात्र, बाळाची आई ईश्वरी बाळासाठी व्याकूळ झाली होती. अखेर संपूर्ण प्रकाराला वैतागून तिने थेट पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन नवऱ्याने बाळ विकल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई करत आरोपी उत्कर्ष दहिवले आणि उषा सहारे या दोघांना अटक केली आहे.
नागपुरात बाळ विक्रीचे रॅकेट सक्रिय:
गेल्या महिन्यात सुद्धा बाळ विक्रीच्या एका प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला होता. अनैतिक संबंधातून जन्मलेले बाळ नागपुरातील एका डॉक्टरने हैदराबाद येथील एका दाम्पत्याला विकले होते. डॉक्टरने नवजात बालिकेची सात लाख रुपयात विक्री केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती.