Advertisement

'ईडी'ची छापेमारी वाढली! यूपीए सरकारच्या काळात ११२, तर मोदी सरकारच्या काळत २,९७४ धाडी

केंद्र सरकारने ईडीच्या कारवायांबद्दल संसदेत दिली माहिती : ईडीच्या कारवायांवर विरोधकांकडून उपस्थित केली जातेय शंका
'ईडी'ची छापेमारी वाढली! यूपीए सरकारच्या काळात  ११२, तर मोदी सरकारच्या काळत २,९७४ धाडी

ईडी हा शब्द आता सगळ्यानाच परिचयाचा झाला आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालय गेल्या काही वर्षात चांगलंच चर्चेत आहे. ईडीकडून होत असलेल्या कारवायांवरून राजकीय वर्तुळात हादरे बसत असून, विरोधकांकडून ईडीचा वापर होत असल्याचा आरोपही होत आहे. अशातच केंद्र सरकारने ईडीकडून करण्यात आलेल्या छापेमारीची आणि प्रकरणाची माहिती लोकसभेत दिली.

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ईडीने किती छापे टाकले, किती लोक दोषी ठरले यासंदर्भातील माहिती सरकारने संसदेत दिली. २००५ मध्ये मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर केंद्रात २०१४ पर्यंत काँग्रेस प्रणित युपीएचं सरकार सत्तेत होतं. त्यानंतर २०१४ ते २०२२ या काळात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार आहे.

केंद्र सरकारने ईडीच्या कारवायांबद्दल लोकसभेत दिलेल्या माहिती नुसार यूपीए सरकारच्या काळात ईडीने ११२ छापे टाकले होते. एनडीएचे सरकार आल्यापासून म्हणजेच २०१४ पासून गेल्या आठ वर्षाच्या काळात २,९७४ छापे टाकले गेले आहेत.

वर्ष २००५ पासून ईडीकडून पीएमएलए कायद्यानुसार कारवाया केल्या जात असल्या तरी आतापर्यंत २३ व्यक्तींनाच शिक्षा झाल्याचं सरकारने दिलेल्या माहितीतून समोर आलं आहे. काँग्रेस प्रणित यूपीए सरकार केंद्रात असतानाच पीएमएलए कायदा अस्तित्त्वात लागू झाला. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या काळात म्हणजेच २००४ ते २०१४ या कालावधीत ईडीने ११२ धाडी टाकल्या.

२०१४ मध्ये देशात सत्तांतर झालं आणि केंद्रामध्ये भाजप प्रणित एनडीएचं सरकार अस्तित्वात आलं. त्यानंतर २०१४ ते २०२२ या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकाच्या कार्यकाळात ईडीच्या कारवाया वाढल्याचंच आकडेवारीतून दिसत आहे. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या काळात ईडीने २,९७४ छापे टाकले आहेत. ८३९ तक्रारीनुसार ९५ हजार ४३२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांचा चौकशी सुरु असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

२००५ पासून ईडीने २०२२ पर्यंत पीएमएलए कायद्यांन्वये एकूण ३,०८६ छापे टाकले आहेत. ४,९६४ ईसीआयर दाखल करण्यात आलेले आहेत. या सर्व प्रकरणापैकी ९४३ तक्रारी दाखल करण्यात आलेल्या असून, आतापर्यत २३ जण दोषी आढळले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in