'असं बिलकुल चालणार नाही!' खड्डे पडलेल्या रस्त्यावरच एकनाथ शिंदेनी अधिकाऱ्यांची घेतली शाळा

आम्ही शिव्या खायच्या... कंत्राटदाराला जाब विचारा, ब्लॅक लिस्ट करा; एकनाथ शिंदेंना संताप अनावर
'असं बिलकुल चालणार नाही!' खड्डे पडलेल्या रस्त्यावरच एकनाथ शिंदेनी अधिकाऱ्यांची घेतली शाळा
अधिकाऱ्यांना सूचना करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे.

ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना संताप अनावर झाला. एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांची पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचा वर्ग घेतला. 'खड्ड्यामुळे आम्ही शिव्या खायच्या, याला काय अर्थ आहे. कोण कंत्राटदार आहे, ब्लॅकलिस्ट करा त्याला', असं म्हणत एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.

ठाण्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली असून, लोकांमधून संताप व्यक्त आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली असून, लोकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्याचा मुद्दा चर्चेच्या वर्तुळात आल्यानंतर आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.

पाहणीनंतर त्यांनी रस्त्यावरच संबंधित अधिकाऱ्यांचा वर्ग घेतल कडक शब्दात सुनावलं. एकनाथ शिंदे म्हणाले, 'परत परत तेच तेच. जे काम केले आहे ते चांगलं काम करा. एमएमआरडीए असो वा संबंधित इतर अधिकारी असो यांनी हे बघितलं पाहिजे. कंत्राटदार जे काम करतो ते नीट करतो का? डांबराच तापमान जितकं आवश्यक असतं, तितकं ठेवलं जातं का, जे काही असेल ते बघितलं पाहिजे ना. लोकांच्या शिव्या कोण खातंय दररोज?', या शिंदे यांच्या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले.

'तु्म्हाला सगळ्यांना काय सांगितलं होतं? पावसाळ्यापूर्वी सगळ्या रस्त्यांची काम करा. काम केलं. पण पहिल्या पावसात पुन्हा खड्डे. परत ते खड्डे बुजवायचे. याला काय अर्थ आहे. याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे ना. त्याला काय फुकटचे पैस द्यायचे का? काम करो वा नीट न करो. रस्त्यावरील खड्ड्यांच्या रोज बातम्या येत आहेत. लोकांना किती त्रास होतो', असं म्हणत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

'खड्डे पडले. भरले. पाऊस पडला पुन्हा खड्डे. हेच करत राहायचं का आपण? हे मला नकोय. कोण अधिकारी आहे. कंत्राटदार कोण आहे, त्याला जाब विचारा... ब्लॅक लिस्ट करा त्याला. असं बिलकुल चालणार नाही. सांगितलं की करायचं नंतर पाऊस आला की वाहून जायचं. याला काय अर्थ आहे. त्या सगळ्याच्या शिव्या आम्ही खायच्या', असं सांगत कामात लक्ष घालण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Related Stories

No stories found.