Election Date: यूपी, गोव्यासह 5 राज्यातील निवडणुकांच्या तारखा अवघ्या काही तासात होणार जाहीर!

Election commission announce schedule for assembly elections: केंद्रीय निवडणूक आयोग पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज (8 जानेवारी) दुपारी 3.30 वाजता जाहीर होणार आहे.
Election Date: यूपी, गोव्यासह 5 राज्यातील निवडणुकांच्या तारखा अवघ्या काही तासात होणार जाहीर!
election commission announce schedule for assembly elections to goa punjab manipur uttarakhand uttar pradesh(प्रातिनिधिक फोटो)

नवी दिल्ली: कोरोना तिसऱ्या लाटेदरम्यान आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांची तारीख आज (8 जानेवारी) जाहीर होणार आहे. उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर केल्या जाणार आहे. यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.

निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 3.30 वाजता 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कोणत्या राज्यात किती टप्प्यात आणि कोणत्या तारखेला कुठे-कुठे मतदान होणार हे समजणार आहे.

यासोबतच नावनोंदणीच्या तारखा, छाननी, निकाल आदींची माहितीही उपलब्ध होईल. येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोव्यात विधानसभेची मुदत संपण्याआधी या निवडणुका घेतल्या जातील.

ज्या 5 राज्यात निवडणुका होणार आहेत त्यापैकी 4 राज्यांमध्ये भाजप प्रणित एनडीएचे सरकार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंग धामी, गोव्यात प्रमोद सावत, मणिपूरमध्ये नॉन्गथोम्बम बिरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत.

कोणत्या राज्यात किती टप्प्यात होऊ शकतात निवडणुका?

  • निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशमध्ये तब्बल 6 ते 8 टप्प्यात निवडणुका होऊ शकतात. सर्वात मोठं राज्य असल्याने उत्तरप्रदेशमध्ये एवढ्या मोठ्या टप्प्यात निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक घेऊ शकतं.

  • पंजाबमध्ये 2 ते 3 टप्प्यात निवडणुका होऊ शकतात. तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होऊ शकते.

  • गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.

  • यावेळी निवडणूक आयोग बूथची संख्या वाढवणार आहे. प्रत्येक बूथवरील जास्तीत जास्त मतदारांची संख्या एक चतुर्थांश पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

  • कोरोना संकट लक्षात घेता निवडणूक आयोग रोड शो, मिरवणुका आणि मोठ्या रॅलींवर निर्बंध किंवा अतिशय कठोर नियम लागू करू शकतं.

  • कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता निवडणूक आयोग कठोर नियम लागू करणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे.

निवडणूक आयोगासमोर नेमकी काय आव्हानं?

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांपैकी मणिपूर हे राज्य निवडणूक आयोगासाठी एक आव्हान बनले आहे. कारण मणिपूरमध्ये आतापर्यंत फक्त 45 टक्के लोकांनाच कोरोनाचे दोन्ही डोस मिळू शकले आहेत, तर केवळ 57 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे. अशा परिस्थितीत इथे कोरोनाच संसर्गाचा धोका आणखी वाढत आहे. त्यामुळे इथे निवडणूक कशी आयोजित करायची हाच निवडणूक आयोगासाठी चिंतेचा विषय आहे.

इतर निवडणूक राज्यांमध्ये कशी आहे लसीकरणांची स्थिती?

  • पंजाबमध्येही 43 टक्के लोकांनाच लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि 77 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे.

  • उत्तर प्रदेशातही दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 60 टक्के आहे तर 89 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे.

  • उत्तराखंडमध्ये 82 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत, तर पहिल्या डोसच्या बाबतीत काही दिवसांत हा आकडा 100 टक्क्यांवर पोहोचेल.

  • गोव्यातील 100 लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर 98 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

म्हणजेच मणिपूर आणि पंजाब ही राज्य आयोगासमोर मोठं आव्हान असणार आहे. आयोगाने पाच राज्यांमध्ये लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त आणि विशेष पथके पाठविण्यावर भर दिला असला तरी, मणिपूर आणि पंजाबवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

प्रशांत किशोर निवडणुकांबाबत काय म्हणाले?

निवडणुकीतील राजकीय पक्षांसाठी रणनीती तयार करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने येत्या काही महिन्यांत होणाऱ्या 5 राज्यांमध्ये किमान 80 टक्के लसीकरण सुनिश्चित करावे. पाच निवडणूक राज्यांमधील किमान 80 टक्के लोकांना कोरोनाचे दोन्ही डोस द्यायला हवेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in