Fact Check : काय आहे 'लालबागच्या राजा'च्या व्हायरल व्हीडिओचं सत्य?
गणेशोत्सव म्हटलं की राज्यात एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह संचारतो. गणपती हा 64 कलांचा अधिपती आहे. त्याचा उत्सव साजरा करताना अवघा महाराष्ट्र भक्तीच्या रंगात रंगून जातो. विविध प्रकारची रोषणाई. विवध प्रकारची सजावट, आकर्षक देखावे हे गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य. मात्र गेल्या वर्षी आणि यावर्षी देशावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळूनच उत्सव साजरा केला जातो आहे. लालबागचा राजा हे मंडळही याला अपवाद नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर लालबागच्या राजाचा एक व्हीडिओ व्हायरल होतो आहे. मात्र हा व्हीडिओ नेमका कधीचा आहे ते आम्ही तुम्हाला या बातमीत सांगणार आहोत.
लालबागचा राजा म्हणजे नवसाला पावणारा अशी त्याची ख्याती. अनेक वर्षांपासून या ठिकाणी कलाकार, दिग्गज दर्शन घेण्यासाठी येतात. मुंबईतील प्रभादेवी भागात ज्या प्रमाणे सिद्धिविनायक मंदिरात दिग्गज सेलिब्रिटी, राजकारणी येतात अगदी त्याचप्रमाणे लालबागचा राजा या गणपतीचं दर्शन घेण्यासाठीही सेलिब्रिटी, राजकारणी, नेते मंडळी येतात. मात्र गेल्या वर्षी आणि या वर्षी कोरोनाचं सावट असल्याने लालबागचा राजा असो किंवा इतर सगळेच सार्वजनिक उत्सव हे साधेपणाने साजरे कऱण्यात येत आहेत. गेल्या वर्षी लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्यात आली नव्हती.

काय आहे व्हायरल होणारा व्हीडिओ?
या व्हीडिओत सुरूवातीला लाल रंगाचा एक पडदा लावलेला सुरूवातीला दिसतो. त्यानंतर हा पडदा हळूहळू वर जातो आणि लालबागचा राजा या गणपतीच्या भव्य मूर्तीचं दर्शन आपल्याला होतं. तसंच गणपती बाप्पा मोरया हा गजरही एक सूरात ऐकू येतो. साधारण दीड मिनिटांचा हा व्हीडिओ मंगळवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र हा व्हीडिओ या वर्षीचा नाही. हा व्हीडिओ आहे 2016 चा.
2016 ला लालबागचा राजा गणपतीचं जे दर्शन एक दिवस आधी मीडियाला झालं होतं तो हा व्हीडिओ आहे. मात्र अनेकांना हे वाटतं आहे की हा व्हीडिओ याच वर्षीचा आहे. अगदी महानायक अमिताभ बच्चनही त्याला अपवाद नाहीत. कारण त्यांनीही हा व्हीडिओ ट्विट केला आहे. तसंच अनेक सेलिब्रिटींनी हा व्हीडिओ या वर्षीचा लालबागचा राजा गणपती समजून ट्विटरवर ट्विट केलाय. काहींनी फेसबुकवर तर काहींनी What's App वर शेअर केला आहे.
या वर्षी एक दिवस आधी लालबागचा राजा गणपतीचं दर्शन होणार का?
या वर्षी लालबागचा राजा या गणपतीचं दर्शन एक दिवस आधी होणार का हे अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान या वर्षी या गणपतीची उंची 4 फूट आहे. दरवर्षी ही मूर्ती 22 फूटांहून उंच असते. मात्र यंदा राज्यावर कोरोनाचं सावट असल्याने अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा केला जाणार आहे. कोव्हिड प्रोटोकॉल पाळून गणेश उत्सव साजरा करण्याचं आवाहन महाराष्ट्रात करण्यात आलं आहे त्याला गणेश उत्सव मंडळानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
घरातूनच घ्या लालबागच्या राजाचं दर्शन
लालबागचा राजा गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचीही सूचना करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा गणेश मंडळाने गणेशभक्तासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना यंदाही लालबागच्या राजाचं घरातूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सव साजरा न करता आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. यावर्षी गणेश उत्सव साजरा होणार आहे पण यंदा लालबागच्या राजाची मूर्ती फक्त 4 फुटांची असणार आहे.