
मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोमणा लगावला आहे. 'नानांच्या प्रचाराला फडणवीस येऊन गेले. आता दोन शब्द जोडले तर काय एकत्रित होतं आणि त्याचा परिणाम-दुष्परिणाम काय होतो हे मी सांगण्याची काही गरज नाही.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांकडे टोमणे बॉम्ब आहेत अशी टीका काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी केली होती. असं असताना आजच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाजपला अनेक टोमणे लगावले आहेत.
पाहा मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना काय-काय टोमणे मारले:
भाजप पैलवानांवर देखील कुस्तीच्या आदल्या दिवशी धाड टाकेल
'कोल्हापूर ही तर मर्दांची भूमी आहे. कालच आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला आहे. पण लढायचं कसं आणि मर्दानी लढायचं कसं ते या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. तरी नशीब ही निवडणूक आहे. राजकीय पक्षाच्या कुस्त्या सुरु झाल्या तर समोरासमोर लढणारा मर्द आपल्या पुढे नाहीए. पण कुस्तीमध्ये जर का भाजप उतरला तर समोरच्या पैलवानावर किंवा पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावर धाडी टाकेल. सीबीआय, ईडीची धाड.'
नाना आणि फडणवीस.. मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोमणा
'कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला राहिला आहे. जो आजही आणि उद्याही राहणार आहे. काल जे कोणी येऊन गेले. म्हणजे काल नानांच्या प्रचाराला फडणवीस येऊन गेले. आता दोन शब्द जोडले तर काय एकत्रित होतं आणि त्याचा परिणाम-दुष्परिणाम काय होतो हे मी सांगण्याची काही गरज नाही.'
'...तर यांचं राजकारण कसं झालं असतं?'
'आज रामनवमी आहे. समजा रामचंद्र प्रभूंचा जन्म झालाच नसता तर यांचं राजकारण कसं झालं असतं? कारण स्वत:च्या कर्तृत्वाचं सांगण्यासारखे काही मुद्दे यांच्याकडे नाहीच आहेत. त्यामुळे धार्मिक मुद्दे पुढे कर, द्वेष पसरवणारे मुद्दे पुढे करं. हे असं सगळं करायचं आणि आपलं काही जे ईप्सित असेल ते साध्य करुन घ्यायचं.'
'जे आता बेंबीच्या देटापासून बोंबलत आहे की, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं... हिंदुत्व कसं सोडलं ओ?.. तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुम्ही काही पेटंट घेतलेलं नाही.' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला उत्तर दिलं आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला भाजप काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.