BMC रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ७ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू? - कुटुंबियांचा आरोप

BMC रुग्णालयात उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याचा कुटुंबियांचा दावा
BMC रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ७ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू? - कुटुंबियांचा आरोप
मृत निशा कसबे

मुंबईच्या मुलुंड परिसरातील एका २६ वर्षीय गर्भवती महिलेचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. निशा कसबे असं या महिलेचं नाव असून मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. मुलुंडच्या श्रीमती. शा.ज.डोसा चांचाणी प्रसुती गृहात निशा यांना दाखल करण्यात आलं होतं. परंतू दाखल करताना दुपारी ४ वाजल्यानंतर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नाहीत ही गोष्ट लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

हॉस्पिटल प्रशासनाने निशासोबत तिच्या घरातील कोणत्याही सदस्याला राहण्याची परवानगी दिली नाही अशी माहितीही नातेवाईकांनी दिली. "निशाच्या पतीला रात्री अडीच वाजता फोन आला ज्यात त्यांना सांगण्यात आलं की निशाची तब्येत बिघडली आहे आणि त्यांना मुलुंड पूर्वेकडील स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालयात हलवण्यात येत आहे. यानंतर तासाभरातच निशाला मृत घोषित करण्यात आलं. निशाची तब्येत अचानक कशी बिघडली याचं उत्तर हॉस्पिटल प्रशासनाने दिलं नाही. तिकडे नाईट ड्यूटीला एकही डॉक्टर नसल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं नाही." अशी माहिती निशाचे दीर विशाल कसबे यांनी मुंबई तक शी बोलताना दिली.

मुंबई महापालिकेने मात्र या प्रकरणी निष्काळजीपणाचे आरोप फेटाळले आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी निशा यांना दोन दिवसांपासून ताप येत होता. काही महत्वाच्या टेस्ट करुन झाल्यानंतर निशाला ब्लड टेस्ट आणि इतर ट्रीटमेंटचा सल्ला देण्यात आला. "सोमवारी संध्याकाळी सदर महिलेला डायरियाचा त्रास जाणवत होता. योग्य ते उपचार झाल्यानंतर या महिलेची तब्येत स्थिरावली होती. परंतू मध्यरात्री डायरियामुळे या महिलेची तब्येत पुन्हा बिघडली. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी या महिलेला स्वा. सावरकर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला", असं स्पष्टीकरण BMC ने दिलंय.

महापालिकेने दिलेल्या स्पष्टीकरणात निशा कसबेचे नातेवाईक वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहचू शकले नाहीत ज्यामुळे त्यांना पोलिसांना कळवावं लागलं. महिलेला सावरकर रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर तिकडील डॉक्टरांनी महिलेला नायर हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला. परंतू तोपर्यंतही महिलेचे नातेवाईक पोहचले नव्हते. महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न सुरु होता, ज्यावेळी तिचे नातेवाईक सावरकर रुग्णालयात पोहचले त्यावेळी महिलेची तब्येत आणखी बिघडली होती.

हे पाहिल्यानंतर सावरकर रुग्णालयातील ICU मध्ये निशा कसबे यांना दाखल करुन डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केली. परंतू यानंतर महिलेची तब्येत सुधारली नाही आणि अखेरीस मंगळवारी दुपारी ३ वाजून २२ मिनीटांनी निशाला मृत घोषित करण्यात आलं. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचं शरीर Autopsy साठी राजावाडी रुग्णालयात पाठवावं लागतं. परंतू निशाच्या नातेवाईकांनी BMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. "एका गर्भवती महिलेला योग्य प्रकारे उपचार न मिळाल्यामुळे आपले प्राण गमवावे लागले. BMC रुग्णालयात दुपारी ४ नंतर डॉक्टर उपलब्ध नव्हते. मी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांना विनंती करतोय की त्यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोषींना शिक्षा द्यावी. तसेच रुग्णालयात २४ तासांसाठी डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी. जेणेकरुन भविष्यात असे प्रसंग टाळता येतील." आम आदमी पक्षानेही या प्रकरणी BMC प्रशासनावर टीका करत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.