MP Supriya Sule यांच्यासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, इंदापूर तालुक्यातली घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वीजबिल थकीत नसतानाही कंपनीने लाईटचं कनेक्शन तोडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर गळ्यात दोरखंड अडकवून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी गावात ही घटना घडली आहे.

झगडेवाडी गावात विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री आणि स्थानिक आमदार दत्ता भरणेही उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर या भागातील शेतकरी शिवाजी चितळकर थेट व्यासपीठावर आले. कोणतीही थकबाकी नसताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन खंडित केले आहे. त्यामुळे उसाचे पीक जळून जात असल्याची कैफीयत सुप्रिया सुळे आणि दत्ता भरणे यांच्यासमोर मांडली. अचानक शेतकऱ्याने खिशात आणलेला दोरखंड काढून आपल्या गळ्याभोवती आवळत फाशी घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी प्रसंगावधान दाखवत या शेतकऱ्याची समजूत काढली. या शेतकऱ्यांची कैफियत अधिकाऱ्यांसमोर मांडून त्याचा प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याचे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र, व्यासपीठावर अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काहीकाळ सगळ्यांची धावपळ उडाली. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका सुरू केला आहे त्यामुळे शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने त्रस्त आहेत. त्यातच चितळकर यांचे नियमित वीजबिल भरत असताना देखील वीज कनेक्शन खंडित केल्याने त्यांनी हा पर्याय निवडावा लागल्याचं शेतकऱ्याने सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT