
नवी दिल्ली: सध्या कोरोनाच्या मिक्स लसीबाबत (Mix Vaccine) जगभरात अभ्यास सुरू आहेत. शास्त्रज्ञांना आशा आहे की, लसीचे दोन वेगवेगळे डोस देऊन कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरूद्ध प्रतिकारशक्ती अधिक चांगली होऊ शकते. दरम्यान, भारतातही एका स्टडीबाबत काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. ज्यानुसार मिक्स लसीमुळे काही सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल (ICMR) च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की कोव्हिशिल्डचा (Covishield) पहिला डोस आणि कोव्हॅक्सिनचा (Covaxin) दुसरा डोस दिल्यास व्हायरसविरूद्ध चांगली प्रतिकारशक्ती दिसून येत आहे.
हा अभ्यास या वर्षी मे आणि जूनमध्ये उत्तर प्रदेशात करण्यात आली आहे. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, एडिनोव्हायरस वेक्टरवर आधारित दोन वेगवेगळ्या लसींचे डोस हे केवळ कोरोनाविरूद्धच नव्हे तर व्हायरसच्या विविध व्हेरिएंटविरूद्ध देखील प्रभावी आहे.
यूपीच्या सिद्धार्थनगरमध्ये 18 लोकांना चुकून देण्यात आला होता मिक्स डोस
दरम्यान, खरं तर आता जे संशोधन ICMR ने समोर आणलं आहे त्याची सुरुवात एका चुकीमुळे झाली होती. या वर्षी मे महिन्यात उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात लसीकरणादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड झाला होता.
काही लोकांना Covishield चा पहिला डोस आणि Covaccine चा दुसरा डोस दिला गेला होता. यामुळे लस मिळालेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. हे प्रकरण सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बरहनी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलं होतं. याची माहिती मिळताच विभागात खळबळ उडाली. पण सुदैवाने याचे कोणालाही साइड इफेक्ट झाले नाही. तसेच आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवली नाही.
ज्या 18 जणांना लस देण्यात आली होती त्यांना प्रशासन नंतर सातत्याने ट्रॅक करत होतं. त्यामुळे या स्टडीमध्ये असेही सुचवले गेले आहे की, मिक्स लस केवळ लसीची कमतरता दूर करण्यास मदत करू शकत नाहीत, तर वेगवेगळ्या लसींबाबत लोकांच्या मनात असलेले गैरसमज आणि संकोच देखील दूर करु शकतं.
या संशोधनातून नेमकं काय समोर आलं?
या संशोधनात 98 जणांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी 40 लोकांना कोविशील्डचे दोन्ही डोस देण्यात आले आणि 40 लोकांना कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस देण्यात आले होते. तर 18 लोक होते ज्यांना कोविशील्डचा पहिला डोस आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला होता.
या संशोधनात असे दिसून आले आहे की ज्यांना दोन्ही वेगवेगळे डोस दिले गेले आहेत त्यांच्यामध्ये कोरोनाच्या अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध रोगप्रतिकारक प्रोफाइल खूपच चांगली दर्शविली गेली आहे. यासह अँटीबॉडी आणि न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज देखील खूप जास्त होते.
मिक्स लसींबाबत WHO चे मत काय आहे?
जुलैमध्ये, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी चेतावणी दिली होती की, कोणीही दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेऊ नये. कारण ते धोकादायक ठरु शकतं. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या होत्या की, हा धोकादायक ट्रेंड आहे कारण अद्याप याबद्दल कोणताही डेटा उपलब्ध नाही. जर वेगवेगळ्या देशांतील लोकांनी दुसरा-तिसरा डोस कधी घ्यायचा हे स्वतः ठरवले तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.
30 जुलै रोजीच कोव्हिड-19 वरील विषय तज्ञ समितीने (SEC)ने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या मिक्स डोसचा अभ्यास करण्यासाठी मंजुरीची शिफारस केली होती. तामिळनाडूमधील वेल्लोर येथील ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजने मिश्र लसीवर अभ्यास करण्यासाठी मान्यता मागितली होती. मात्र, सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.