Maharashtra Rains 2021: Chiplun मध्ये महाप्रलय, 2005 पेक्षाही भयानक महापूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चिपळूण: रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय बनले आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने अवघं चिपळूण शहर जलमय झाले असून 2005 पेक्षाही अधिक प्रमाणात पूर आला आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये सात फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.

याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत.

रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. पाणी वाढण्याचा वेग मोठा आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड , भोगाळे, परशुराम नगर याबरोबरच खेड परिसरात पाणी वाढत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रॉयल नगर तसेच राधाकृष्ण नगरमधील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेकांच्या चारचाकी व दुचाकी पाण्याखाली आहेत. याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक जण घरात अडकले आहेत.

पहाटे चार वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले. शहरालगतच्या खेर्डीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून अनेक घरे पाण्याखाली आहेत. याशिवाय पावसाचा जोर वाढत असून पाणी पातळीत तीव्र गतीने वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दरम्यान, हायटाईड व अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड व चिपळूणमध्ये गंभीर परिस्थिती आहे असे जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. बचावकार्यासाठी स्थानिक चिपळूण नगरपालिका 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालू केले आहे. तर रत्नागिरीमधून 1, पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

पुणेहून NDRF च्या दोन टीम पुणे (खेडसाठी 1 व चिपळूणसाठी 1) येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करणेत येत आहेत. तातडीची गरज लगल्यास 94202 44937 अजय सूर्यवंशी आपत्ती निवारण अधिकारी यांना संपर्क करावा असे आव्हान करण्यात आलं आहे.

Maharashtra Rain: Satara जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, कोयना धरणातील पाणीसाठा प्रचंड वाढला; चिपळूण-कराड मार्गावर पाणी

NDRF च्या दोन टीम चिपळूणला रवाना

दरम्यान, या सगळ्या परिस्थितीबाबत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

‘रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यातही चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. हायवेच्या दोन्ही बाजूला पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले आहेत. अशा स्थितीत दोन एनडीआरएफच्या टीम पाठविण्यात आल्या आहेत.’

‘कोस्टल कार्डकडे देखील मदत मागण्यात आली आहे. ठिकठिकाणी जेवणाची पाकिटे पोहचविण्यात येणार आहे. यावेळी सुटका करण्यात आलेल्या लोकांना तात्काळ सुरक्षित स्थळी पोहचविण्याचा प्रयत्न सुरु आहे.’

‘परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पुरामुळे जीवितहानी झाल्याची आता सध्या तरी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. सर्व परिस्थितीवर संपूर्ण यंत्रणा लक्ष ठेऊन आहे. कोणत्याही परिस्थितीत मदत कमी पडू नये अशा सूचना संपूर्ण शासकीय यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. दरम्यान प्रशासन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.’ असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT