'ईडी'वरून राज्यात पेटलं रण; सीतारामन म्हणतात, 'इच्छा असली तरी तपास थांबवू शकत नाही'

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी विविध मुद्द्याबद्दल मांडली सरकारची भूमिका
'ईडी'वरून राज्यात पेटलं रण; सीतारामन म्हणतात, 'इच्छा असली तरी तपास थांबवू शकत नाही'

'ईडी'कडून सुरू असलेल्या कारवायांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्रातील भाजप सरकारकडून गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून दररोज केला जात आहे. 'ईडी' आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संर्घष विकोपाला गेला आहे. याच मुद्द्यावर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोजक्याच वाक्यात उत्तर दिलं.

अर्थसंकल्पा सादर झाल्यानंतर पहिल्यादांच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी एनएसई, चित्रा रामकृष्ण आणि हिमालयी बाबा, त्याचबरोबर ईडीच्या कारवायांबद्दल विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं.

ईडीच्या कारवायांबद्दल बोलताना केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, "कोणताही गुन्हा घडल्याशिवाय ईडी त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. याची एक दीर्घ प्रक्रिया आहे. ईडी केवळ विरोधक आहेत म्हणून मागे लागत नाही. आधीच तपासात असलेला आणि पीएमएलए कायद्याशी संबंधित गुन्हा असेल. त्यामुळे माझी इच्छा असली, तरी मी या तपासात हस्तक्षेप करू शकत नाही किंवा तपास थांबवू शकत नाही," असं सीतारामन म्हणाल्या.

एनएसईचं कामकाज एका अदृश्य योगीच्या सांगण्यानुसार केलं जात होतं, असा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला. यावर बोलताना सीतारामन म्हणाल्या, "एनएसईशी संबंधित प्रकरणावर सरकारची नजर आहे. या प्रकरणाचा तपास विविध यंत्रणांकडून सुरू आहे. माझ्याकडे जे अहवाल आले आहेत, ते मी बघत आहे. या प्रकरणावर लवकरच मंत्रालय पत्रकार परिषद घेईल. आताच काही बोलणं योग्य ठरणार नाही", असं केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या.

देशातील सर्वात मोठा शेअर बाजार असलेल्या एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकार चित्रा रामकृष्ण या २० वर्ष एका हिमालयातील योगीच्या सांगण्यानुसार राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्णय घेत होत्या, असं सेबीच्या चौकशीतून समोर आलं आहे. या प्रकरणात आता सीबीआयकडून चौकशी सुरू आहे.

अलिकडेच सीबीआयने माजी ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम (सुब्रमण्यम यांची चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयातील अदृश्य योगीच्या सांगण्यावरुन नियुक्ती केली होती. त्यांना योगीच्या सांगण्यावरून पगारवाढ दिली गेली. त्याचबरोबर पात्रता नसता बढती दिली गेली.) यांची चौकशी केली. त्याचबरोबर चित्रा रामकृष्ण यांचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in