'वीर सावरकरांच्या नावाने राजकारण करणारे सत्तेसाठी आंधळे झाले, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले'

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर आणि काँग्रेसवर कडाडून टीका
'वीर सावरकरांच्या नावाने राजकारण करणारे सत्तेसाठी आंधळे झाले, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले'
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे Photo- India Today

गेली अनेक वर्षे वीर सावरकरांच्या नावाने राजकारण करणारे लोक आज सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. ज्या लोकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पळपुटे म्हटलं. ज्यांनी महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर काँग्रेसच्या मासिकात सावरकरांची सपशेल बदनामी केली अशा लोकांसोबत काहींनी सत्तेसाठी हात मिळवला. हे तेच आहेत जे कालपर्यंत वीर सावरकरांचं नाव घेऊन राजकारण करत होते. अशांकडे पाहून मला आश्चर्य वाटतं.

ज्या लोकांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म घेतला, ज्या लोकांना काळ कोठडी तर सोडाच पण साधी जमीनही बघितली नाही ते लोक वीर सावरकरांना पळपुटे कसं काय म्हणू शकतात? अशा लोकांना माझं आव्हान एक दिवस हात बांधून अंदमानच्या काळ कोठडीत राहून दाखवा, तसं केलंत तर तुमच्यासमोर सगळं हरायला तयार आहोत असं आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिलं. सगळ्या धर्माच्या जातीच्या लोकांना एकत्र करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकसंघ होऊन लढा दिला. आजही सावरकरांच्या यातना कमी झालेल्या नाहीत.

भारतातली लोकं शांत आहेत हे इंग्रजांना माहित होतं. महात्मा गांधी यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं महत्त्व कमी नाही, त्यांचं महत्त्व आपण मान्य केलंच पाहिजे कारण त्यांनी सामान्य माणसाला या स्वातंत्र्य लढ्याशी जोडून घेतलं. मात्र त्याचवेळी आमच्या क्रांतिकारांचं योगदान विसरू शकत नाही. संपूर्ण भारत पेटून उठतो आहे हे इंग्रजांना कळलं त्यामुळे ते राज्य करू शकले नाहीत. ही क्रांतीची मशाल कुणी पेटवली असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी
महाविकास आघाडीफोटो-इंडिया टुडे

मराठी कट्ट्याची सुरूवात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण करून आपण करतो आहोत. लोकमान्य टिळकांनी जी ठाम मतं मांडली, त्या ठाम मतांचं परिवर्तन सशस्त्र क्रांतीत कुणी केलं असेल तर ते फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर होते असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गिरगावात पहिला मराठी कट्टा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Related Stories

No stories found.