Anil Deshmukh Arrest: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ED कडून अटक, 12 तासांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई

Anil Deshmukh arrested by ED: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री उशिरा ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
Anil Deshmukh Arrest: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ED कडून अटक, 12 तासांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई
Former Home Minister of Maharashtra anil deshmukh placed under arrest by ED(फाइल फोटो)

मुंबई: महाराष्ट्रात सोमवारी मध्यरात्री एक अत्यंत मोठी घडामोडी घडली आहे. नुकत्याच मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ईडीकडून ही अटक करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

अनिल देशमुखांच्या अटकेचं ED ने काय दिलं कारण?

अनिल देशमुख हे सोमवारी (1 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. साधारण दुपारी बारा वाजता ईडी कार्यालयात गेलेल्या अनिल देशमुख यांची रात्री साडेबारा वाजेपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती. मात्र, चौकशीदरम्यान अनिल देशमुख हे सहकार्य करत नसल्याचा दावा करत ईडीने त्यांना अटक केली. आता ईडी अनिल देशमुख यांची कोठडी मिळावी यासाठी त्यांना 2 नोव्हेंबरला न्यायालयात हजर करणार आहे.

अनिल देशमुख यांना आतापर्यंत ईडीने तब्बल पाच समन्स बजावले होते. परंतु ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. मात्र, सोमवारी सकाळी अचानक ते ईडी कार्यालयात दाखल झाले होते. यानंतर ईडीकडून त्यांची तब्बल 12 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली.

ईडीकडून बजावण्यात आलेल्या समन्सच्या विरोधात अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळले आणि त्यांना त्यांच्या वकिलासह ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

दरम्यान, ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन काही माहिती दिली होती. ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, 'हायकोर्टाच्या आदेशानुसार मी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होत आहे आणि मी माझ्या वकिलांसोबत ईडीसमोर हजर राहणार आहे. दरम्यान, यापूर्वी ईडीच्या अधिकार्‍यांनी या वर्षी जूनमध्ये अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अटक केली होती.

नेमकं प्रकरण काय?

ईडीचा अनिल देशमुखांविरोधात असा आरोप आहे की, तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याने काही हॉटेल मालकांकडून 4.3 कोटी रुपये उकळले होते. जे नंतर त्याने देशमुखांच्या सहाय्यकांना दिले होते. यानंतर दिल्लीस्थित शेल कंपनीच्या माध्यमातून हेच पैसे नागपूरमधील देशमुख आणि कुटुंबाद्वारे चालवल्या जाणार्‍या शैक्षणिक ट्रस्टला देण्यात आले होते.

ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेही टाकले होते. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे याच्यामार्फत देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांची वसूलीचे जे आरोप करण्यात आले होते त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ईडीकडून अनिल देशमुख यांना चौकशीसाठी वारंवार समन्स बजावण्यात आलेलं होतं. पण देशमुख ईडीसमोर हजर झाले नव्हते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अशीही चर्चा सुरु होती की, अनिल देशमुख हे देश सोडून पळू तर गेलेले नाही ना? पण आज सकाळी अनिल देशमुख हे अचानक ईडी कार्यालयात आले आणि चर्चांना पूर्णविराम दिला. अखेर रात्री उशिरा ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Former Home Minister of Maharashtra anil deshmukh placed under arrest by ED
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हनीमूनला गेले का? अमृता फडणवीसांचा खोचक प्रश्न

'मी सरळमार्गी आणि नैतिकतेला धरुन चालणारा माणूस..'

अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात जाण्याआधी ट्विटरवरुन आपली संपूर्ण भूमिका स्पष्ट केली होती. 'मी सरळमार्गी आणि नैतिकतेला धरुन चालणारा माणूस..' असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं होतं.

'मला जेव्हा ईडीचा समन्स आला त्यावेळेस मी ईडीला सहकार्य करत नाही अशाप्रकराच्या चुकीच्या बातम्या वर्तमान पत्रात, प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी आपल्याला सांगू इच्छितो की, आपल्याला ज्या-ज्या वेळेस ईडीचा समन्स आला त्या-त्या वेळेस मी कळवलं की, माझी याचिका हायकोर्टामध्ये आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सुप्रीम कोर्टात सुद्धा याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये येईल.'

'ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरावर छापे टाकले तेव्हा मी माझ्या परिवाराने माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनीच.. माझे कर्मचारी आहेत त्या सर्वांनी त्यांना सहकार्य केलं. सीबीआयचे मला दोनदा समन्स आले त्या दोन्ही समन्सला मी स्वत: सीबीआयच्या ऑफिस जाऊन मी स्वत: माझा जबाब तिथे दिला आहे. अजूनही केस सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. पण आज मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये हजर झालेलो आहे.'

'आपल्याला माहिती आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ज्या परमबीर सिंगांनी माझ्यावर आरोप केलेत ते परमबीर सिंग आज कुठे आहेत? ज्या बातम्या वर्तमानपत्रात येत आहेत, ज्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत त्यानुसार परमबीर सिंग भारत सोडून पळून गेले परदेशात. अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत.'

'ज्यांनी अनिल देशमुखावर आरोप केला तोच आरोप करणारा पळून गेला. आज परमबीर सिंग विरुद्ध त्याच्याच पोलीस खात्यातील अधिकारी, अनेक व्यवसायिक यांनी अनेक पोलीस तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच त्याचा जो सहकारी होता API सचिन वाझे त्याने सुद्धा परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर आरोप केले.'

'आज सचिन वाझे खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. सचिन वाझे याआधी सुद्धा तुरुंगात होता. सचिन वाझेला नोकरीतून काढण्यासाठी प्रक्रिया सुरु केल्यानंतर आणि सरकारने नोकरीतून काढल्यानंतर त्याने माझ्यावर आरोप केले आहे.'

'अशा या परमबीर सिंग आणि सचिन वाझे सारख्या लोकांच्या आरोपावरुन माझी जी चौकशी होत आहे माझ्या कुटुंबीयांना जो त्रास दिला जात आहे त्याबद्दल मला अतिशय दु:ख होत आहे.'

'मी सरळमार्गाने चालणारा, नैतिकतेला धरुन चालणारा व्यक्ती आहे. 30 वर्षात माझ्यावर एक सुद्ध आरोप या राजकीय किंवा सामाजित जीवनात लागलेला नाही. पण आज दु:खाची गोष्ट ही आहे की, परमबीर जो देश सोडून पळून गेला माझ्यावर आरोप करुन. सचिन वाझे हा तर आजही तुरुंगात आहे.'

'त्यांनी केलेल्या माझ्यावरील आरोपाची आज ईडी आणि सीबीआय चौकशी करतंय. याचं मला अतिशय दु:ख आहे.' अशा शब्दात अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in