पुणे: कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा लग्न सोहळा दोन दिवसापूर्वी पुण्यातील हडपसर येथे पार पडला होता. मात्र या लग्न सोहळ्यात कोरोना प्रतिबंधक नियम थेट धाब्यावर बसवण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. आता याच प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये धनंजय महाडिक यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाही लग्न सोहळ्यात 200 हून अधिक जण उपस्थित असल्याचं दिसून आलं होतं. तसंच अनेकांनी मास्क देखील लावलं नसल्याचं यावेळी पाहायला मिळालं होतं. एकीकडे राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात लग्न सोहळा साजरा झाल्याने त्यावर बरीच टीका होत आहे.
दरम्यान, कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी माजी खासदार धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि लॉन्सचे मॅनेजर निरुपल केदार या तिघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अशी माहिती हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण कदम यांनी ‘मुंबई तक’ला दिली आहे.
ही बातमी देखील पाहा: धनंजय महाडिकांच्या मुलाच्या लग्नात कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर
राष्ट्रीय आपत्कालीन प्रशासन अधिनियम 2005 कलम 51 आणि महाराष्ट्र कोव्हिड धोरण योजना 2020 च्या कलम 11 अंतर्गत आयपीसी 188, 269, 271 याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नात कोरोनाचे नियम धाब्यावर
दरम्यान, या लग्न सोहळ्यात एक हजाराहून जास्त लोक सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते या लग्नाला उपस्थित होते. या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
माजी खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी यांचा विवाह सोहळा पुण्यात पार पडला. मात्र या लग्नात कोरोना नियम कुठेही पाळले गेल्याचं दिसलं नाही. वधू वरांना स्टेजवर भेटायला जात असतानाही अनेकांनी मास्क घातला नसल्याचं दिसून आलं. तसंच सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यात आलं नाही. काही लोकांनी मास्क हनुवटीवर घेत फोटोसाठी पोज दिली होती. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यात सध्या नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.