पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश आणि चार राज्यांच्या निवडणुका संपल्या आहेत. निकालही लागल्यात जमा आहेत. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढणार का? जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात का? असं वाटू लागलं आहे असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेल आधीच महाग झालं आहे. मुंबईत पेट्रोलचा दर आज घडीला 96 ते 97 रूपये लिटर आहे. डिझेलचे दरही वाढले आहेत अशात निवडणुका झाल्याने आणि निकाल स्पष्ट झाल्याने महागाई आणखी वाढणार का अशी चिंता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
चार राज्यांच्या निवडणुका संपल्या आहेत. निकालही लागल्यात जमा आहेत. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढणार का? जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात का? असं जनतेला वाटू लागलं आहे.
रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
पेट्रोल आणि डिझेलचे दर हे निवडणुका होईपर्यंत स्थिरावले होते. पेट्रोल आणि डिझेल महाग झालं असलं तरीही जनता कोरोनाच्या संकटात या महागाईलाही तोंड देताना दिसते आहे. अशात आता निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार का? अशी चिंता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या चारही राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. 2 तारीख म्हणजेच आज सकाळपासून या ठिकाणी मतमोजणी सुरू झाली आहे. सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं ते पश्चिम बंगालकडे कारण पश्चिम बंगालमध्ये थेट ममतादीदी विरूद्ध नरेंद्र मोदी असा सामना होता. मात्र पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी बहुमत मिळवून मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. ममतादीदी हॅट ट्रिक करणा असा अंदाज वर्तवला जातच होता आणि ते खरं होताना दिसतं आहे. तसंच परवाच अनेक न्यूज चॅनल्स एक्झिट पोल्सनीही ममता बॅनर्जींना झुकतं माप दिलं होतं. त्यामुळे आता ममता पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे स्पष्ट झालंय. अशात निकाल लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल महाग होणार का? अशी भीती आता रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेली भीती जर खरी ठरली तर सामान्य माणसांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे हे मात्र नाकारता येणार नाही. रोहित पवारांनी या आशयाचं ट्विट काही वेळापूर्वीच केलं आहे.