अँटेलिया, वाझेंना अटक ते 100 कोटींचा लेटरबॉम्ब बदली पाहा आतापर्यंत काय-काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अवघा महाराष्ट्र हा गेल्या काही दिवसांपासून अनेक वेगवेगळ्या विषयांवरुन ढवळून निघत आहेत. मात्र, सध्या ज्या विषयावरुन संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे तो म्हणजे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली कार, त्याच कारचा मालक मनसुख हिरेनचा मृत्यू आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं निलंबन.

हा विषय नेमका आहे तरी काय याविषयी सध्या चर्चेला अक्षरश: उधाण आलं आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊयात या संपूर्ण विषयाबाबत अगदी सविस्तरपणे. (from antilia to sachin vaze via mansukh hiren what has happened so far see the whole case on one click)

खरं तर या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली ती देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशियत कार आणि त्यामधील जिलेटिन कांड्यांमुळे. इथून सुरु झालेल्या या प्रकरणाने अतिशय गंभीर वळण घेतलं आहे. त्यामुळे या घटनेतील प्रत्येक बाब आता आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

25 फेब्रुवारी 2021 रोजी काय-काय घडलं?

1. अंबानींच्या घराबाहेर सापडली संशयित कार

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ (अँटेलिया) 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडे सहा-सात वाजेच्या सुमारास एक संशयित कार आढळून आली होती. या कारबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची तपासणी केली होती. त्यावेळी कारमध्ये काही जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या.

ADVERTISEMENT

जेव्हा याबाबतची माहिती माध्यमांसमोर आली तेव्हा संपूर्ण देशात अक्षरश: खळबळ उडाली. एवढंच नव्हे तर त्याच दिवशी पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज देखील लागलं. ज्यामध्ये दिसून आलं की, एका व्यक्तीने स्कॉर्पिओ कार अँटेलिया बाहेर पार्क केली होती आणि नंतर तो मागे उभ्या असलेल्या इनोव्हा कारमधून निघून गेला होता.

ADVERTISEMENT

या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रांचकडे चौकशीसाठी सोपवलं होतं. तेव्हा या प्रकरणाचे तपास अधिकारी हे सचिन वाझे हे होते.

मुकेश अंबानींच्या घराजवळ संशयित कार आढळल्याने खळबळ

26 फेब्रुवारी 2021 रोजी काय-काय घडलं?

1. धमकीचं पत्र आणि अनेक नंबर प्लेटही सापडल्या होत्या!

दरम्यान, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारी 2021 रोजी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली होती. ती म्हणजे याच कारमध्ये मुंबई इंडियन्सच्या नावे एक बॅग ठेवण्यात आली होती आणि याच बॅगमध्ये एक धमकीचं पत्र देखील सापडलं होतं.

हे पत्र मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांना उद्देशून लिहिण्यात आलं होतं. ज्यामध्ये मुकेश यांना भाई आणि निता यांचा भाभी असा उल्लेख करण्यात आला आहे.

त्यात असं म्हटलं होतं की अशा त-हेने संशयित कार त्यांच्या घराबाहेर पार्क करुन त्यात जिलेटीनच्या कांड्या ठेवणं ही फक्त एक झलक आहे. पुढच्या वेळेस या जिलेटीनच्या कांड्या कनेक्ट करुन (म्हणजे त्यापासून स्फोटक बनवूनच) येईल.

पूर्ण अंबानी कुटुंबाला उडविण्याचा बेत आहे असल्याचंही या पत्रात आवर्जून नमूद कऱण्यात आलं होतं.

या कारमध्ये पोलिसांना फक्त धमकीचं पत्रच नव्हे तर अनेक नंबर प्लेट देखील सापडल्या होत्या. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील काही नंबर प्लेट या मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यात असणाऱ्या गाड्यांशी मिळत्या-जुळत्या होत्या. त्यामुळे या प्रकरणी मुंबई पोलिसांनीदहशतवादाच्या अँगलने तपासणी सुरु केली होती.

मुकेश अंबानी यांना आलेलं धमकीचं पत्र मुंबई तकच्या हाती

28 फेब्रुवारी 2021 रोजी काय-काय घडलं?

1. जैश-उल-हिंदने अंबानींच्या घराबाहेरील गाडीप्रकरणी जबाबदारी घेतल्याचं बॅनर आले होते समोर

28 फेब्रुवारी 2021 रोजी अंबानींच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणी आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली. ती म्हणजे संशयित गाडीबाबत जैश-उल-हिंद या नावाच्या एका संघटनेनं जबाबदारी स्वीकारल्याचं वृत्त समोर आलं होतं. या संघटनेने टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून ही जबाबदारी स्वीकारल्याचं देखील सांगितलं जात होतं.

पहिल्या दिवशी जे बॅनर समोर आलं होतं. त्यात असं म्हटल होतं की, ‘थांबवू शकत असाल तर थांबवून दाखवा… तुम्ही तेव्हा देखील काहीही करु शकला नव्हता जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखालून दिल्लीत तुम्हाला ‘हिट’ केलं होतं. तुम्ही मोसादसोबत हातमिळवणी केली पण काहीही झालं नाही. तुम्ही लोकं वाईट पद्धतीने अपयशी ठरला आहात आणि पुढे देखील तुम्हाला यश मिळणार नाही.’

याच मेसेजमध्ये पुढे असं लिहलं आहे की, (अम्बानिज साठी) ‘तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. फक्त पैसे ट्रान्सफर करा, जे तुम्हाला आधी सांगितलं होतं.’ यामुळे या संपूर्ण प्रकरणात दहशतवादी संघटनेचाच हात आहे अशी सगळ्यांची समजूत झाली होती.

अंबानींच्या घराबाहेरील गाडीप्रकरणी ‘या’ संघटनेने घेतली जबाबदारी

1 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. ‘आमच्याकडून अंबानींना धोका नाही’, पोलिसांकडून जैश-हिंदचं बॅनर जारी

दुसऱ्याच दिवशी दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने आपण प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यावेळी मुंबई पोलिसांनी अधिकृतरित्या जैश-उल-हिंद संघटनेचा एक बॅनर शेअर केला होता.

त्या बॅनरमध्ये असं म्हटलं होतं की, त्यांनी अंबानींना कोणतीही धमकी दिलेली नव्हती. त्यामुळे मीडियामध्ये आमच्या नावे जे पत्र फिरतं आहे ते खोटं आहे.

‘आज सकाळी आम्ही पाहिलं की, भारतीय मीडियामध्ये एक वृत्त सुरु होतं की, आम्ही ‘जैश-उल-हिंद’ने भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील जी कार पार्क केली आहे त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्हाला जैश-उल-हिंदच्या नावाने सुरु असणाऱ्या टेलीग्राम अकाउंटबाबत देखील माहिती पडलं आहे.’

‘ज्यामध्ये याच घटनेचा उल्लेख करत एक बॅनर जारी करण्यात आलं आहे. पण आता आम्ही आमच्या या पोस्टरद्वारे स्पष्ट करु इच्छितो की, ‘जैश-उल-हिंद’चा या घटनेशी काहीही संबंध नाही. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील घटना, कथित टेलीग्राम अकाउंट आणि पोस्टर यांचा जैश-उल-हिंदचा काहीही संबंध नाही. आमचं खोटं पोस्टर बनविणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो.’

2. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीच्या मालकाचं नाव आलं होतं समोर

दुसरीकडे याच प्रकरणात स्कॉर्पिओ गाडी ज्या व्यक्तीची होती त्याचं नाव देखील समोर आलं होतं. अंबानींच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती ती ठाण्यातील मनसुख हिरेन यांची होती. जी काही दिवसांपूर्वी चोरी झाल्याची त्यांनी तक्रारही पोलिसात केली होती. त्यामुळे पोलिसांनी मनसुख हिरेन यांची चौकशी सुरु केली होती.

‘आमच्याकडून अंबानींना धोका नाही’, पोलिसांकडून जैश-हिंदचं बॅनर जारी

2 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. मला तपासयंत्रणांकडून त्रास दिला जातोय: मनसुख हिरेन

18 फेब्रुवारी 2021 रोजी मनसुख हिरेन यांची कार चोरीला गेली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार देखील केली होती. पण त्यांच्या या गाडीचा वापर हा अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या ठेवण्यासाठी झाल्याचं समजताच हिरेन यांच्यामागे तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता.

त्यामुळे 2 मार्च 2021 रोजी मनसुख हिरेन यांनी मुंबई पोलीस, एटीएस, NIA यांच्याकडून होणाऱ्या चौकशीचा आपल्याला मानसिक त्रास होत असल्याची तक्रार करणारं पत्र मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई-ठाणे पोलीस आयुक्तांना यांना लिहलं होतं.

या पत्रात हिरेन यांनी सचिन वाझे, जॉईंट सीपी भारंबे यांच्याकडून आपली वारंवार चौकशी होत असल्याचं म्हटलं होतं. या चौकशीमुळे माझं मानसिक स्वास्थ्य बिघडलं असून काही पत्रकार या प्रकरणात मला व माझ्या परिवाराला नाहक त्रास देत असल्याचं हिरेन यांनी म्हटलं होतं.

मला तपासयंत्रणांकडून त्रास दिला जातोय!

5 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. मनसुख हिरेन प्रकरणी विधानसभेत मोठा ट्विस्ट

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट हा 5 मार्च 2021 रोजी आला. तो देखील थेट विधानसभेत. कारण याच दिवशी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली गाडी आणि त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्यावरुन थेट क्राईम ब्रांचमधील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर हल्लाबोल केला होता.

याप्रकरणात अनेक ठिकाणी सचिन वाझे यांचं नाव समोर येत असल्याने संशयाला वाव आहे असं म्हणत फडणवीसांनी याप्रकरणी वाझेंच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच हे संपूर्ण प्रकरण एनआयएकडे सोपविण्याची मागणी देखील केली होती.

2. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला खाडीत

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन तास देखील पूर्ण झालेला नसताना एक प्रचंड धक्कादायक आणि संपूर्ण प्रकरणाला वळण देणारी बातमी समोर आली. ती म्हणजे Antilia बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा म्हणजेच मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्यातील खाडीत सापडला होता.

5 मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह हा सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी बाहेर काढण्यात आला होता. मुंब्रा रेती बंदर येथील खाडीत मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. दरम्यान, 5 मार्च रोजी सकाळीच नौपाडा पोलीस ठाण्यात मनसुख हिरेन बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती.

3. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे-अनिल देशमुख

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घातल्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात आला.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळला आहे. हे प्रकरण NIA कडे अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावं अशी मागणी विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कार प्रकरणात अनेक योगायोग आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं. तसंच सचिन वाझे हे पोलीस अधिकारी घटना जिथे घडली तिथे सर्वात आधी कसे पोहचले असाही प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एटीएसकडे सुपूर्द केलं होतं.

4. ‘पती आत्महत्या करु शकत नाही’, मनसुख हिरेनच्या पत्नीची प्रतिक्रिया

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी त्याच दिवशी त्यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी या प्रकरणी मीडियाला प्रतिक्रिया दिली होती की. ‘आपला पती आत्महत्या करु शकत नाही.’

‘मी आणि माझा परिवार कधी असा विचारही करु शकत नाही की, आमची गाडी 8 दिवसांपूर्वी चोरी झाली होती. माझ्या पतींना पोलिसांचे फोन येत असल्याने ते चौकशीसाठी जात होते. ते पूर्ण दिवस त्यांना तिथेच बसवून ठेवायचे. रात्रं-दिवस त्यांनी पोलिसांना खूप सहकार्य केलं. काल देखील त्यांना बोलावलं होतं.’

‘फोन आल्यानंतर ते निघून गेले होते आणि परत काही आलेच नाही. त्यांचा फोन काल रात्रीपासूनच बंद येत होता. कांदिवलीच्या क्राईम ब्रांचमधून तावडे म्हणून अधिकाऱ्याचा फोन आला होता. ते घरातून गेल्यानंतर अर्धा-एक तासाने त्यांचा फोन बंद झाला. आम्ही रात्रभर त्यांची वाट पाहिली. अखेर सकाळी आम्ही पोलिसात तक्रार नोंदवली.’

‘कांदिवलीच्या तावडे या क्राईम ब्रँचमधील अधिकाऱ्याचा फोन आला आहे. ते मला असं देखील म्हणाले की, मला भेटण्यासाठी बोलावलं आहे तर मी फक्त त्यांना भेटून येतो. जेव्हा-जेव्हा पोलिसांचे फोन यायचे तेव्हा-तेव्हा ते जायचे. आज मीडियामध्ये जी बातमी आली की, पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी आत्महत्या केली. ते कधीही असा विचार करु शकत नाहीत.’

‘त्यांच्याविरोधात ज्या अफवा पसरविण्यात आल्या आहेत त्या खूप चुकीच्या आहेत. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आमच्या कुटुंबावर या सगळ्याचा परिणाम झाला आहे. आमचा सध्या तरी कुणावरही संशय नाही. मला सध्या तरी त्याबाबत काहीही माहिती नाही. पण माझे पती कधीही आत्महत्या करु शकत. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की, ही चौकशी सखोल झाली पाहिजे.’

Antilia बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला खाडीत

6 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास परिवाराचा नकार

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी परिवाराने त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला आहे. पोलिस जाणुनबुजून पोस्ट मार्टम रिपोर्ट सादर करत नसल्याचा आरोप करत हिरेन यांच्या परिवाराने त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला होता.

पोस्टमार्टम इन कॅमेरा करण्यात यावं अशी मागणी देखील हिरेन यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली होती. मात्र, याबाबत योग्य आश्वासन देऊन ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी हिरेन यांच्या परिवाराची समजूत काढली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारुन अंत्यसंस्कार केले होते.

हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास परिवाराचा नकार

8 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. मनसुख हिरेन प्रकरण : एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेंचा यामधील सहभागावर विरोधीपक्षाने प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

यानंतर याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला होता. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत याप्रकरणात सर्व कागदपत्रं आणि पुरावे हाती घेतले आहेत. हिरेन यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी दिला ज्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा नसल्याचं नमूद केल होतं.

हिरेन यांच्या मृत्यूचं नेमकं कारण हे Viscera Report आणि Chemical Analysis चा रिपोर्ट आल्यानंतर समजेल अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली होती.

2. अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ प्रकरणात NIA करणार तपास

केंद्रीय गृहमंत्रालयाने मुंबईत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओमधील जिलेटीन कांड्याबाबतचा तपास NIA कडे सोपवला. दरम्यान संपूर्ण प्रकरणाचाच तपास हा NIA कडे सोपवावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.

मात्र, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास हा ATS च करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे जिलेटीन कांड्यासंबंधीचा तपास हा NIA आणि मनसुख मृत्यू प्रकरण आणि गाडी चोरीचं प्रकरण ATS करणार असल्याचं स्पष्ट झालं.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे-अनिल देशमुख

9 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. मनसुख हिरेन मृत्यू: सचिन वाझेंना तात्काळ अटक करा – देवेंद्र फडणवीस

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी 9 मार्च रोजी विधानसभेत पुन्हा एकदा गदारोळ पाहायला मिळाला होता. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती.

हिरेन यांच्या पत्नीने दिलेला पोलीस जबाब वाचून दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल चढवला होता.

2. Sachin Vaze नी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय-विमला हिरेन

‘सचिन वाझे यांनीच माझे पती मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय मला आहे.’ असा आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी त्यांचा जबाबात नोंदवला होता. ज्यामुळे विधानसभेत एकच खळबळ उडाली.

‘माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. सदरचा खून सचिन वाझे यांनी केला असावा असा मला संशय आहे म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी अशी विनंती आहे.’ असं जबाब त्यांनी पोलिसांना दिला होता.

Sachin Vaze नी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय-विमला हिरेन

10 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. मोठी बातमी! सचिन वाझेंची क्राईम ब्रांचमधून बदली

9 मार्च रोजी विधानसभेत सचिन वाझे प्रकरणी विरोधकांनी सरकारवर प्रचंड टीकेची उठवली. त्यानंतर 10 मार्च रोजी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने मोठं पाऊल उचलत मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत असलेल्या सचिन वाझे यांची बदली करुन त्यांना दुसऱ्या विभागात पाठवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधकांनी सचिन वाझे प्रकरणावरुन सरकारला घेरण्यास सुरुवात केली. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत बोलत असताना एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात जो कोणी दोषी आढळेल…मग तो सचिन वाझे असो किंवा कोणाचा जावई असो त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं.

तोपर्यंत सचिन वाझे यांना क्राईम ब्रांचमधून हलवून दुसऱ्या विभागात टाकण्यात येत असल्याचं अनिल देशमुख यांनी जाहीर केलं. हिरेन यांच्या तपासात सचिन वाझेंचा सहभाग कुठेही येऊ नये यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचं देशमुख यांनी जाहीर केलं.

2. अंबानींच्या घराबाहेर सापडलेली Scorpio मी वापरलेली नाही-सचिन वाझे

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ATS ने सचिन वाझेंचा जबाब नोंदवला आहे. आपल्या जबाबात सचिन वाझे यांनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली मनसुख हिरेन यांच्या मालकीची स्कॉर्पिओ वापरली असल्याचं नाकारलं आहे.

मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी असं सांगितलं होतं की ज्या स्कॉर्पिओ मध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळल्या आणि जी स्कॉर्पिओ अँटेलिया बाहेर आढळली ती सचिन वाझे यांच्याकडे नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होती. ५ फेब्रुवारी सचिन वाझेंनी स्टेअरिंग जाम असल्याचं कारण देत ही स्कॉर्पिओ परत केली होती.

मनसुख हिरेन यांना मृत्यूच्या एक दिवस आधी भेटलो असल्याचंही सचिन वाझे यांनी त्यांच्या जबाबात नाकारलं आहे. मनसुख हिरेन हे अडचणीत सापडल्याचं लक्षात येताच हिरेन कुटुंबीयांनी तुम्हाला संपर्क करण्याचं का ठरवलं असं विचारलं असता हिरेन कुटुंबीयांचा माझ्यावर विश्वास होता म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असं उत्तर सचिन वाझे यांनी दिलं आहे.

अंबानींच्या घराबाहेर सापडलेली Scorpio मी वापरलेली नाही-सचिन वाझे

12 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. वाझेंची क्राइम ब्रांचमधून करण्यात आली बदली

मनसुख हिरेन प्रकरणात आरोप झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात दिली होती. त्यानुसार 12 मार्च 2021 रोजी सचिन वाझे यांची बदली करण्यात आली होती.

सुरुवातीला वाझे यांची बदली मुंबईच्या नागरी सुविधा केंद्र विभागात करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण त्याच्या अवघ्या काही तासानंतरच हा निर्णय बदलून वाझेंची नियुक्ती मुंबईतील स्पेशल ब्रांच 1 मध्ये करण्यात आली होती.

13 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. सचिन वाझे NIA पुढे जबाब नोंदवण्यासाठी हजर

25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. सुरूवातीला ही कार कुणाची आहे? ही कार कुणी ठेवली? या सगळ्याची उकल झाली नव्हती. अजूनही ही कार नेमकी कुणी ठेवली ते समजू शकलेलं नाही.

मात्र, ही स्कॉर्पिओ कार मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला सापडला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होतं. अखेर संपूर्ण प्रकरणी सचिन वाझे हे NIA पुढे जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले होते.

2. सचिन वाझेंना अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंना अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. सचिन वाझे यांची चौकशी एटीएस मार्फत करण्यात आली. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठीही सचिन वाझे यांनी अर्ज केला.

मात्र या अर्जावर १९ मार्चला सुनावणी होणार आहे. कोर्टाने सध्या त्यांना अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. कोर्टात झालेल्या युक्तीवादा दरम्यान सचिन वाझे हजर नव्हते. मात्र सचिन वाझे यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी फक्त संशय व्यक्त केला आहे.

तसंच या प्रकरणात कोणताही प्रथमदर्शनी पुरावा या प्रकरणात सचिन वाझेंच्या विरोधात नाही. एवढंच नाही तर एटीएस सचिन वाझेंना त्रास देतं आहे. मनसुख हिरेन प्रकरणाशी सचिन वाझेंचा काहीही संबंध नाही असंही वाझे यांच्या वकिलांनी सांगितलं. मात्र अंतरिम सुरक्षा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

3. 13 तासाच्या चौकशीनंतर API सचिन वाझे यांना NIA कडून अटक

दरम्यान 13 तासाच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी एनआयएकडून अटक करण्यात आली. या अटकेआधी सचिन वाझे यांची तब्बल १३ तास चौकशी एनआयएकडून सुरु होती. अखेर या चौकशीनंतर सचिन वाझेंना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

वाझे हे काल सकाळी एनआयए कार्यालयात ११ वाजता पोहचले होते. त्यानंतर एटीएस आणि क्राईम ब्रांचचे काही अधिकारी देखील तिथे पोहचले होते. यावेळी एनआयएकडून सचिन वाझे यांना याप्रकरणी बरेच प्रश्न विचारण्यात आले. अखेर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी संशयित कार सापडली होती त्याप्रकरणी वाझे यांना अटक करण्यात आली.

मोठी बातमी: 13 तासाच्या चौकशीनंतर API सचिन वाझे यांना NIA कडून अटक

14 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. वाझेंच्या अटकेनंतर मोठी घडामोड, NIA ला सापडली पांढरी इनोव्हा कार!

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अँटेलिया कार प्रकरणी घडामोडींना प्रचंड वेग आला. 14 मार्च रोजी पहाटे एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार टोईंन करुन एनआयए कार्यालयात आणली गेली. त्यामुळे ही तीच इनोव्हा कार आहे का? जी अंबानींच्या घराबाहेर दिसली होती याबाबत एनआयएचे अधिकारी आता तपास करत आहेत.

दरम्यान, यामधील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या कारच्या मागच्या बाजूला POLICE असंही लिहल्याचं प्रथमदर्शनी दिसतं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील गुंता अधिक वाढला आहे.

15 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. वाझेंसाठी मध्यरात्री डॉक्टरला पाचारण, NIA ऑफिसमध्ये काय घडतंय?

अँटेलिया संशयित कार प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासाठी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास डॉक्टरांना एनआयए कार्यालयात पाचारण करण्यात आलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, याबाबत एनआयएकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

2. ‘याच’ CCTV फुटेजनंतर NIA ने केली सचिन वाझेंना अटक, पाहा नवं फुटेज

राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात NIA ने काही सीसीटीव्ही फुटेज जमा केली आहेत. यात सर्वात महत्वाचं फुटेज हे त्या संशयित इनोव्हा कारचे आहे. ज्यामुळे API सचिन वाझे यांच्याभोवती सगळी तपासाची चक्र फिरू लागली आहेत.

पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणारी इनोव्हा कार आणि अँटेलियाबाहेर दिसून आलेली इनोव्हा कार या एकच असल्याचं NIAच्या तपासातून समोर येत आहे. सचिन वाझे ज्या गुन्हे तपास शाखेत अर्थात CIUमध्ये कार्यरत होते, त्या शाखेमध्ये ही इनोव्हा कार वापरली जात होती.

NIAने केलेल्या तपासात २४ फेब्रुवारीचे सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा धागा ठरला आहे. पोलीस मुख्यालयातून २४ तारखेला ही इनोव्हा कार बाहेर पडली. नंतर ही इनोव्हा ठाण्याच्या दिशेने गेली. वाझेंच्या CIUमध्ये हीच इनोव्हा वापरली जात होती. असं NIA च्या तपासात आढळून आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

3. अँटेलिया कार प्रकरण भोवलं, Sachin Vaze पोलीस दलातून निलंबित

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. अतिरिक्त आयुक्त (स्पेशल ब्रांच) यांच्या आदेशानुसार एपीआय सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले आहे. एनआयएने अँटेलिया संशयित कारमधील जिलेटीन कांड्यांप्रकरणी सचिन वाझेंना अटक केली आहे. त्याच अटकेनंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

16 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. वाझेंच्या सोसायटी CCTVबाबत मोठा खुलासा, ‘मुंबई तक’च्या हाती पत्र

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर अँटेलियाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारसंदर्भात दररोज नवनवीन अतिशय धक्कादायक असे खुलासे होत आहेत. याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे वाझे यांच्या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर हे त्यांच्याच टीममधील अधिकाऱ्यांनी नेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे सीसीटीव्ही फुटेज डिलीट तर करण्यात आलेलं नाही ना? असा NIA ला संशय आहे.

CCTV फुटेज ताब्यात घेण्याआधी सीआयूचे अधिकारी रियाझुद्दीन काझी यांनी वाझे राहत असलेल्या सोसायटीला एक पत्र दिलं होतं. ज्या पत्रात असं म्हटलं होतं की, ‘EXPLOSIVE ACT 4 (a)(b)(i) गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात तपासकामी आम्हाला आपल्या साकेत सोसायटीच्या सर्व सिसिटिव्हि कॅमेऱ्याचे फुटेज पाहिजे आहे.’

2. वाझेंच्या सोसायटीमधलं ते CCTV फुटेज NIA च्या ताब्यात

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA च्या हातात महत्वाचा पुरावा हाती लागला आहे. सचिन वाझे यांच्या ठाणे येथील साकेत सोसायटीचं सीसीटीव्ही फुटेज NIA च्या हाती लागलं आहे. मनसुख हिरेन यांच्याकडे असलेली स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्यानंतर ती वाझे यांच्याकडे होती आणि ही कार वाझेंनी आपल्या सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये ठेवल्याचा NIA ला संशय होता. या पार्श्वभूमीवर NIA ने काल रात्री Crime Intelligence Unit च्या कार्यालयात छापे मारले.

या छापेमारीत NIA ने लॅपटॉप, फोन, साकेत सोसायटीमधल्या सीसीटीव्ही फुटेजचा DVR ताब्यात घेतला आहे. सचिन वाझे यांनी आपल्या सोसायटीमधील सीसीटीव्हीचा DVR काढून घेतला होता. याव्यतिरीक्त सचिन वाझे यांच्या केबिनमधून अनेक महत्वाची कागदपत्र NIA च्या हाती लागलेली आहेत. आतापर्यंत या प्रकरणातला हा सर्वात मोठा पुरावा NIA च्या हाती लागल्याचं बोललं जातंय.

17 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. NIA नुसार PPE KIT घातलेली ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच!

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयित कार पार्क करताना CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती PPE कीट मध्ये दिसून आला होता. याबाबत आता एक प्रचंड मोठा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. तो म्हणजे PPE किट मधील व्यक्ती ही सचिन वाझेच होती. याबाबत NIA नेच माहिती दिली असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सचिन वाझे हे अधिकाधिक अडकत असल्याचं दिसून येत आहे.

या प्रकरणात जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं त्या सीसीटीव्ही फुटेजची चौकशी NIA ने सुरू केली होती. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीपीई किट घातलेला संशयित कोण होता हे देखील NIA कडून तपासण्यात येतं होतं. त्यावेळी तिथे सचिन वाझे हजर होते की नव्हते हे देखील तपासलं गेलं. याप्रकरणी NIA ने केलेल्या तपासात आता अशी माहिती समोर आली आहे की, पीपीई किट घातलेली व्यक्ती ही दुसरी-तिसरी कुणीही नसून ते सचिन वाझेच आहेत.


2. Sachin Vaze यांनीच स्वत:च्या सोसायटीचे CCTV फुटेज केले डिलीट: NIA सूत्र

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणाचा तपास सर्वप्रथम गुन्हे तपास शाखा म्हणजे सचिन वाझेच करत होते. त्यावेळी त्यांनी जप्त केलेले काही डिजिटल पुरावे नष्ट केले किंवा त्यांच्याशी छेडछाड केल्याचा संशय एनआयएला असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. जप्त केलेल्या पुराव्यातील काही डेटाही गहाळ असल्याचंही सांगण्यात येत आहे.

सचिन वाझे राहत असलेल्या साकेत सोसायटीमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर म्हणजे डिजिटल व्हीडिओ रेकॉर्डर संदर्भातले पुरावेही वाझेंनी डिलीट केले असल्याचे किंवा त्याच्याशी छेडछाड केल्याचा एनआयएला संशय आहे.

हे पूर्ण प्रकरण मुख्यत्वे डिजिटल पुराव्यांवर आधारित आहे. त्यामुळे यातील डिजिटल पुराव्यांना मोठे महत्त्व आहे. म्हणूनच, सचिन वाझे यांनी नियोजनपूर्वक ते पुरावे हटवण्याचा प्रयत्न केला असल्याचं एनआयए सूत्रांनी म्हटलं आहे.

3. मोठी बातमी: मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली, सचिन वाझे प्रकरण भोवलं

अँटेलिया संशयित कार, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझे अटक हे संपूर्ण प्रकरण आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना भोवलं आहे. कारण आज (17 मार्च) परमवीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी आता हेमंत नगराळे हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (16 मार्च) रात्री उशिरापर्यंत ‘वर्षा’ बंगल्यावर चर्चा सुरु होती. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, हेमंत नागराळे आणि परमवीर सिंग हे उपस्थित होते. तब्बल चार तास ही बैठक सुरु होती. यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात देखील सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

  • हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काम पाहतील.

  • रजनीश शेठ यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार असेल

  • संजय पांडे यांच्यावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • परमवीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावर हटविण्यात आलं असून त्यांच्याकडे आता होमगार्डची महासंचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

3. NIA कडून वाझेंच्या टीममधील पोलीस अधिकाऱ्याची तब्बल 9 तास चौकशी, नेमकं काय घडलं?

अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याच Crime Intelligence Unit टीममधील API रियाझ काझी यांची NIA कडून काल (17 मार्च) तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. यावेळी रियाझ काझी यांना याबाबत काय-काय विचारणा करण्यात आली याविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

NIA कार्यालयातून रियाझ काझी हे साधारण 10.15 वाजता बाहेर पडले. यावेळी माध्यामांनी या चौकशीबाबत त्यांच्याकडे प्रतिक्रिया देखील मागितली. मात्र, रियाझ काझी यांनी याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. दुसरीकडे सूत्रांच्या मते, या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझेंसोबत सीआययूच्या इतर अधिकाऱ्यांवर देखील NIAची करडी नजर आहे. त्यामुळे आता वाझेंनंतर आणखी कोण-कोण अडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मोठी बातमी: मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली, सचिन वाझे प्रकरण भोवलं

18 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. ‘मुंबई पोलिसांपासून सचिन वाझेंना सुरक्षित ठेवा नाहीतर, त्यांचाही मनसुख हिरेन होऊ शकतो’

‘सचिन वाझे यांना NIA ने सुरक्षित ठेवावं नाही तर त्याचाही मनसुख हिरेन होऊ शकतो.’ अशी भीती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्ती केली आहे. याचवेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.

या सर्व प्रकरणात ‘मातोश्री’च्या संपर्कात असलेल्या मोठ्या नेत्यांची नावं पुढं येऊ शकतात असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

अँटेलिया कार प्रकरणी सचिन वाझे यांच्या चौकशीतून बरीच माहिती समोर आली असून एनआयएने मुंबई पोलिसांपासून वाझेंना सुरक्षित ठेवलं नाही तर मनसुख हिरेन प्रमाणेच त्यांची देखील हत्या होऊ शकते असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

2. Sachin Vaze यांनी २५ फेब्रुवारीला घातलेला कुर्ता रॉकेल ओतून जाळला, NIA च्या सूत्रांची माहिती

सचिन वाझे यांनी २५ फेब्रुवारी या तारखेला दोन कुर्ते सोबत घेतले होते. त्यातला एक कुर्ता त्यांनी रॉकेल ओतून मुलुंड टोल नाका ओलांडल्यानंतर जाळून टाकला अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली आहे. अँटेलियाबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सचिन वाझे हे कुर्ता घालून आणि डोक्याला रूमाल बांधून फिरत होते असं दिसलं आहे. या प्रकरणी सचिन वाझेंना अटक केल्यानंतर ते वास्तव्य करत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीत एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जाऊन तिथले काही महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांच्या घरातून आणि कारमधून अत्यंत महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. सचिन वाझे यांनी २५ तारखेच्या रात्री दोन कुर्ते सोबत बाळगले होते. त्यातला एक कुर्ता त्यांच्या घरी मिळाला आहे. जो एनआयएने ताब्यात घेतला आहे. दुसरा कुर्ता त्यांनी मुलुंड टोल नाका क्रॉस केल्यानंतर रॉकेल ओतून जाळला असल्याचंही NIA च्या सूत्रांनी म्हटलं आहे.

निव्वळ ‘या’ एका गोष्टीसाठी सचिन वाझेंकडून एवढा गंभीर गुन्हा?

19 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. Sachin Vaze आणि मनसुख हिरेन १७ फेब्रुवारीला भेटले, सीसीटीव्ही फुटेज समोर

अँटेलिया स्कॉर्पिओ प्रकरणात आता नवी घडामोड समोर आली आहे. API सचिन वाझे आणि मनसुख हिरेन हे १० मिनिटांसाठी भेटले होते. महाराष्ट्र ATS ला सीसीटीव्ही फुटेजमधून हा पुरावा समोर आला आहे. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन हे १७ फेब्रुवारीला भेटले त्यानंतर ते मर्सिडिझमधे बसले आणि १० मिनिटं चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ ही मर्सिडिझ उभी होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून CIU युनिट आणि मुंबई पोलीस मुख्यालय हे पायी जाण्याच्या अंतरावर आहे.

१७ फेब्रुवारीलाच मनसुख हिरेन यांनी त्यांची कार मुलुंड ऐरोली रोडवर बंद पडल्याचं म्हटलं होतं. त्यांनी त्यांची कार एका बाजूला लावली होती आणि ते ओला कॅब करून दक्षिण मुंबईत गेले होते. त्यांना जव्हेरी बाजारात काम होतं असं त्यांनी सांगितलं होतं. या प्रकरणी एटीएसने ओला कॅब ड्रायव्हरचाही जबाब नोंदवला आहे. ओला कॅब ड्रायव्हरने दिलेल्या जबाबानुसार मनसुख हिरेन यांनी त्याला आपल्याला क्रॉफर्ड मार्केटला सोड असं सांगितलं होतं.

मुंबई पोलिसांचं आयुक्तालय आणि CIU ऑफिस हे क्रॉफर्ड मार्केट भागातच आहे. ओला कॅब ड्रायव्हरने दिलेल्या जबाबात असंही सांगितलं की मनसुख हिरेन यांना फोन येत होते… त्यावर ते फोनवर बोलणाऱ्या माणसाला सर अशी हाक मारत होते. ATS ला असं वाटतं आहे की सर ही व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून सचिन वाझेच आहे. दरम्यान क्रॉफर्ड मार्केट जवळ येऊ लागलं असतानाच मनसुख यांनी कॅब ड्रायव्हरला सांगितलं की तू मला आणखी पुढे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सोड असं सांगितल्याचंही कॅब ड्रायव्हरने म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन आणि मुंबई पोलीस आयुक्तालय या ठिकाणाहून एटीएसला महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं आहे. या फुटेजमध्ये सचिन वाझे हे मर्सिडिझ कारमध्ये बसल्याचं दिसतं आहे. त्यानंतर हीच कार सीएसटी स्टेशनजवळही दिसते आहे. या कारचा पार्किंग लाईट सुरू होता. या ठिकाणी मनसुख हिरेन आला आणि तो या कारमध्ये बसला. त्याने सचिन वाझेंसोबत दहा मिनिटं चर्चा केली. त्यानंतर ही कार पुढे गेली.. आणखी दहा मिनिटं ती पुढे पार्क होती. त्यानंतर मनसुख हिरेन कारमधून उतरले.

या दहा मिनिटांच्या भेटीत मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओची चावी सचिन वाझेंना दिली असावी असा संशय एटीएसला आहे. ही मर्सिडिझ कार नंतर पुन्हा पोलीस आयुक्तालयाच्या पार्किंगमध्ये दिसते आहे. वाझे यांना जेव्हा स्कॉर्पिओच्या चाव्या मिळाल्या तेव्हा त्यांनी त्या आपल्या काही अधिकाऱ्यांकडे दिल्या. त्यांनी कार बंद पडली होती तिथून काढून सचिन वाझे यांच्या साकेत कॉम्प्लेक्स येथील पार्किंगमध्ये लावून ठेवली. १८ फेब्रुवारीला मनसुख हिरेन यांनी आपली कार चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर २५ फेब्रुवारीला ही कार मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करण्यात आली होती. यामध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या आणि धमकीचं पत्रही होतं.

2. सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत ! NIA ची कोर्टात माहिती

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे NIA च्या अटकेत आहेत. वाझे यांची कस्टडी मिळाल्यानंतर NIA ने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक महत्वाचे पुरावे शोधले आहेत. दरम्यान स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS चे अधिकारी करत आहेत. सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान NIA च्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगितलं आहे.

वाझे तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्यांची अजुन योग्य पद्धतीने चौकशी करु शकत नसल्याचं NIA ने कोर्टात सांगितलं. वाझे यांच्या चौकशीदरम्यान कोर्टाने त्यांच्या वकीलांना हजर राहण्याची परवानगी दिली आहे. परंतू वाझे यांचे वकील हजर नसल्यामुळे ते तपासात सहकार्य करत नसल्याचं NIA ने सांगितलं. ज्याला उत्तर देताना वाझे यांच्या वकीलांनी त्यांची बाजू मांडणाऱ्या वकीलांच्या पथकातील एक सदस्य साजल यादव हे खास या केससाठी NIA ऑफिसजवळील हॉटेलमध्ये राहत आहेत. चौकशीदरम्यान त्यांना कधीही बोलवता येऊ शकतं, परंतू NIA ने त्यांना चौकशीदरम्यान बोलावलंच नसल्याचं सांगितलं.

3. ‘ती’ व्यक्ती सचिन वाझेच होती का? फॉरेन्सिक टीम रिपोर्ट देणार!

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या संशयित कारचा तपास आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आला आहे. या केसच्या तपासासाठी काल (19 मार्च) रात्री Crime Recreation देखील करण्यात आलं. यावेळी सचिन वाझे यांना पांढरा कुडता, आणि डोक्याला रुमाल बांधून अँटेलियाजवळ बराच वेळ चालविण्यात आलं. यानंतर आता सीसीटीव्हीमध्ये दिसलेली व्यक्ती ही सचिन वाझेच होती का हे पुण्याची फॉरेन्सिक टीम ठरवणार आहे.

NIA ची टीम काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सचिन वाझे यांना Crime Recreation साठी घटनास्थळी घेऊन आली होती. यावेळी NIA सोबतच पुण्याहून आलेल्या फॉरेन्सिक टीममधील काही अधिकारी देखील होते. (the forensic team will now report whether the person seen on cctv was sachin vaze)

तसेच मुंबई पोलिसांची देखील एक टीम हजर होती. Crime Recreation वेळी फॉरेन्सिक टीमने काही महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. यावरुन अँटेलियाजवळ कार पार्क करण्यात वाझे कशाप्रकारे सक्रीय होते हे फॉरेन्सिक अहवालाच्या माध्यमातून तपासलं जाणार आहे.

EXCLUSIVE: ‘Encounter Specialist’ सचिन वाझेंचं रहस्यमय आयुष्य, पाहा आजपर्यंत काय-काय केलंय

20 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. मोठी बातमी: मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही NIA कडे, ATS ला धक्का

अँटेलिया संशयित कार प्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. कारण याच केसशी निगडीत असणाऱ्या मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे होता. मात्र याप्रकरणी एटीएसला फार गती मिळाली नसल्याने आता हा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरण NIAकडे हस्तांतरित करण्याबाबतची अधिसूचना देखील जारी झाली आहे. एनआयएच्या प्रवक्त्याने या संदर्भातील आदेश प्राप्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सुरुवातीला संशयित स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने त्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने चौकशीअंती पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली होती. दुसरीकडे याचसंबंधी मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हा महाराष्ट्र एटीएस करत होता. पण आता या प्रकरणी एनआयए तपास करणार आहे.

2. ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब ! अनिल देशमुखांनी वाझेंना दर महिन्याला १०० कोटी मागितले – परमबीर सिंग

मुंबई पोलीस दलाचे निलंबीत अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतर राज्य सरकारसमोरील अडचणी काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA ने या केसमध्ये अनेक पुरावे शोधून काढले. ज्यानंतर राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करुन त्यांना होमगार्ड विभागात टाकलं. त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची वर्णी लागली. परंतू पदावरुन हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडे महिन्याला १०० कोटींची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

अनिल देशमुख यांना एका कार्यक्रमात बोलत असताना अँटिलीया बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांचा तपास करत असताना मुंबई पोलिसांकडून आणि आयुक्तांकडून काही चुका झाल्या आणि या चुका माफ करण्यासारख्या नव्हत्या. म्हणूनच परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्याचं सांगितलं होतं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.

“मार्च महिन्याच्या मध्यावधीत मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला अँटिलीया बाहेरील तपासाची माहिती देण्यासाठी आलो होतो. त्यावेळी मी या तपासात माननीय गृहमंत्र्यांकडून होत असलेल्या अनेक चुकीच्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती दिली. याबद्दल मी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनाही माहिती दिली. काही मंत्र्यांना माझ्या ब्रिफींगमधले मुद्दे आधीच माहिती असल्याचं माझ्या लक्षात आलं.” या पत्रात पुढे परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडून १०० कोटींची मागणी केल्याचाही उल्लेख केला आहे.

‘मुंबईत सतराशे बार आहेत, रेस्टॉरंट आहेत; ४०-५० कोटी सहज जमू शकतात!’

21 मार्च 2021 रोजी काय-काय घडलं?

1. ‘नक्कीच सरकारवर शिंतोडे उडाले आहेत’, संजय राऊतांचं अत्यंत मोठं वक्तव्य

‘गेल्या 72 तासात एका पत्रामुळे त्याआधी एका पोलीस फौजदारामुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत.’ असं थेट वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकार घडविण्यात मोठा वाटा असणाऱ्या संजय राऊतांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्याने आता या संपूर्ण प्रकरणाबाबत आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे.

‘विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून सरकारमध्ये उलथापालथ होत नाही. गेल्या 72 तासात एका पत्रामुळे आणि त्याआधी एका पोलीस फौजदारामुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत. हे मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे आहे. कारण मी काही सरकारचा चार आण्याचा चहाचा ओशाळा नाही. यामुळे नक्कीच सरकारवर शिंतोडे उडालेले आहे. त्यामुळे हे कसं धुवून काढायचं, स्वच्छ प्रतिमेने कसं बाहेर पडायचं या संदर्भात सगळ्यांनी बसून चर्चा करणं गरजेचं आहे.’ अशी स्पष्ट कबुली संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

2. अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास केंद्राने केल्यास ‘फटाक्याची माळ’ लागेल: राज ठाकरे

मुख्यमंत्री आणि मुकेश अंबानी यांच्यात मधुर संबंध आहेत आणि ते सर्वश्रुत देखील आहेत. अशावेळी वाझे कुणी सांगितल्याशिवाय बॉम्बची गाडी अंबांनीच्या घराखाली ठेवेल का? त्यामुळे या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन चौकशी करावी. ही चौकशी योग्यरित्या झाली तर ‘फटक्यांची माळ’ लागेल.’ अशी प्रतिक्रिया देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अँटेलिया संशयित कार प्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘या संपूर्ण प्रकरणी राज्य सरकारकडून योग्य चौकशी केली जाणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळेच माझी हात जोडून विनंती आहे की, अंबानींच्या घराखाली स्फोटकांनी भरलेली गाडी कुणी ठेवली आणि कुणाच्या सांगण्यावरुन याची चौकशी केंद्र सरकारने केली पाहिजे.’ असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

3. अनिल देशमुखांबाबत उद्यापर्यंत निर्णय घेऊ: शरद पवार

‘आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे फार गंभीर आहेत. पण परमबीर सिंग यांनी बदली झाल्यानंतरच हे आरोप केले आहेत. तसंच त्या पत्रावर त्यांची सही देखील नाही. आयुक्त असताना परमबीर यांनी असे कोणतेही आरोप केले नव्हते. अनिल देशमुखांबाबत नेमका निर्णय उद्यापर्यंत सर्वांशी चर्चा करुन घेतला जाईल. त्याआधी अनिल देशमुख यांचं म्हणणं देखील ऐकून घेऊ.’ शरद पवारांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे.

दरम्यान, याचवेळी शरद पवार असंही म्हणाले की, ‘चौकशीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा.’ त्यामुळे आता शरद पवारांनी यासंबंधी चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे टोलवला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT