
देशात आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेता येणार आहे. १० एप्रिल म्हणजेच आजपासून बूस्टर डोस सर्वांना मिळेल अशी घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली होती. ज्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेता येणार आहे. एवढंच नाही तर ज्यांचं वय १८ वर्षे आणि त्यापुढे आहे आणि लसीचा दुसरा डोस घेऊन ज्यांना नऊ महिने पूर्ण झाले आहेत अशा सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेता येणार आहे असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीचे दर कमी करण्यात आली आहे. सीरमने खासगी रुग्णालयासठी कोव्हिशिल्डचे दर हे तब्बल ३७५ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. कोव्हिशिल्डची लस आता २२५ रुपयांना मिळणार आहे. सोबतच भारत बायोटेकच्या सुचित्रा एला यांनी देखील खासगी रुग्णालयासाठी कोवॅक्सीनच्या किंमत कमी केल्या आहेत. कोवॅक्सीनची किंमत आता १२०० वरून २२५ रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच १६जानेवारी २०२१ ला देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील सर्व प्रौढांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे १८५.३८ कोटी डोस देण्यात आले आहेत. १५ वर्षांवरील जवळपास ९६ टक्के लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर ८३ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या तीन लाटा भारतात येऊन गेल्या. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रूग्णसंख्या आणि लोकांचे बळीही गेली. दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर म्हणावी अशीच होती. या लाटेत मृत्यूंचं प्रमाण हे सर्वाधिक होतं. देशात आणि राज्यात तिसरी लाट आली तोपर्यंत लसीकरणाचा जोर वाढला होता. त्यामुळे या लाटेतूनही आपण तरून गेलो. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक व्ही आणि झायडस कॅडिला या लसी भारतात दिल्या जातात. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी या लसी उपयोगी पडत आहेत. आता आजपासून याच लसींचा बूस्टर डोस देण्यासही सुरूवात झाली आहे.