Gadchiroli Encounter : 26 नक्षलवाद्यांची नावं आली समोर; अनेकांवर लाखो रुपयांचा इनाम

Milind Teltumbde : मिलिंद तेलतुंबडेवर होता 50 लाखांचा इनाम : 17 नक्षलवाद्यांची ओळख पटली, पोलीस मृतदेहांची ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करणार
Gadchiroli Encounter : 26 नक्षलवाद्यांची नावं आली समोर; अनेकांवर लाखो रुपयांचा इनाम
गडचिरोलीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावं प्रसिद्ध.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात असलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवरील जंगलात झालेल्या चकमकीत सी-६० कमांडोंनी काही जहाल नक्षलवाद्यांसह 26 जणांना कंठस्नान घातलं. ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये 6 महिलांचा समावेश असून, 20 पुरूष आहेत. यातील काही जणांची ओळख पटली असून, चकमकीत ठार झालेल्यांची यादी समोर आली आहे. यात अनेक नक्षलवाद्यांची माहिती देणाऱ्यांना पोलीस खात्याकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आलेली होती.

गडचिरोली पोलीस विभागाच्या सी-६० कमांडोंच्या पथकांनी शनिवारी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीवरून रानकट्टा (महाराष्ट्र)-हिंडकोटोला (छत्तीसगढ) दरम्यान असलेल्या जंगलात शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी नक्षल्यांशी सी-६० कमांडोंची चकमक झाली. यात 26 नक्षलवादी ठार झाले आहेत. जहाल नक्षलवादी आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मिलिंद तेलतुंबडे याचाही मृत्यू झाला आहे.

26 जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यातील काही नक्षलवाद्यांची माहिती देणाऱ्यांसाठी लाखो रुपयांची बक्षिसंही घोषित करण्यात आलेली होती.

या यादीत जहाल नक्षलवादी आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मिलिंद तेलतुंबडे याचं नावही आहे. त्यामुळे नक्षलवादी कमांडर तेलतुंबडे चकमकीत ठार झाल्याचं अधिकृतपणे निश्चित झालं आहे.

यादीत मिलिंद तेलतुंबडेचं नाव 15व्या क्रमांकावर आहे. मिलिंद तेलतुंबडेचं नाव जिवा ऊर्फ दिपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे (रा. राजुर, ता. वणी, जि. यवतमाळ) असं आहे. मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. त्याचबरोबर एमएमसी प्रभारीही होता. मिलिंद तेलतुंबडेची माहिती देणाऱ्याला 50,00,000 इनाम देण्याची घोषणा करण्यात आलेली होती.

चकमकीत ठार झालेल्यां नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोली जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या सर्व मृतदेहांच्या कोरोना चाचण्या करून शवविच्छेदन केलं जाणार असून, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. हे सर्व मृतदेह ओळख पटवून नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाणार आहेत.

हिंडकोटोला-रानकट्टाच्या पट्ट्यात काय घडलं?

कोटगुल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या हिंडकोटोला-रानकट्टा जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहीम सुरू होती. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. शोध मोहिमेवेळी शनिवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी 5 वाजताच्या दरम्यान पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात २६ नक्षलवादी ठार झाले.

सी-60 कमांडो नाव कसं पडलं?

देशातील नक्षलग्रस्त भागांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा काही भाग येतो. जिल्ह्याच्या स्थापनेपासून परिसरात नक्षलवाद्यांच्या हालचालींसह अनेक कारवाया वाढत गेल्या. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याच्या उद्देशानं तत्कालीन पोलीस अधीक्षक के.पी. रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ 60 विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती. या संख्येवरूनच हे नाव देण्यात आलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in