Prakash Jadhav : प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र; त्यांच्या शौर्याच्या कहाणीने तुमचाही उर येईल भरून

Gallantry Award 2021, Prakash Jadhav : साथीदारांना दूर ढकलत अंगावर गोळ्या झेलणाऱ्या शौर्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव : पत्नी आणि आईने स्वीकारलं पदक
Prakash Jadhav : प्रकाश जाधव यांना मरणोत्तर कीर्ती चक्र; त्यांच्या शौर्याच्या कहाणीने तुमचाही उर येईल भरून
शहीद जवान प्रकाश जाधव यांच्या शौर्याचा कीर्ती चक्र देऊन गौरव करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद.PBI/twitter

आपल्या असामान्य शौर्याचं दर्शन घडवतं देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या लष्करातील जवानांना शौर्य पदकं देऊन सन्मानित करण्यात येतं. यंदाही अनेक जवानांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव राष्ट्रपतीच्या हस्ते करण्यात आला. यात एक नाव होतं. प्रकाश जाधव यांचं! सहकाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः अंगावर दहशतवाद्यांच्या गोळ्या झेलणाऱ्या सॅप्पर प्रकाश जाधव यांच्या शौर्याचा मरणोत्तर कीर्ती चक्र देऊन गौरव करण्यात आला.

शहीद जवान प्रकाश जाधव यांच्या पत्नी राणी प्रकाश जाधव आणि आई शारदा जाधव यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते कीर्ती चक्र स्वीकारलं. राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला. शहीद जवान प्रकाश जाधव मूळचे बेळगाव आहेत. प्रकाश जाधव यांना लष्करातील दुसऱ्या क्रमांकांच्या शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आलं.

प्रकाश जाधव
प्रकाश जाधव Twitter

27 नोव्हेंबर 2018... अनंतनाग (जम्मू काश्मीर)

27 नोव्हेंबर 2018 रोजी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात येणाऱ्या रेडबानी गावात दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार लष्कराने गावाला वेढा देत शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेचं नेतृत्व करत होते प्रकाश जाधव!

प्रकाश जाधव सहकारी जवानांसोबत दहशतवादी लपून बसलेल्या घराजवळ पोहोचले. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास त्या घराजवळ पोहोचले आणि घरात शिरले. जवान जिना चढत असतानाचा आवाज ऐकून घरातील दहशतवादी सावध झाले आणि त्यांनी अंदाधूंद गोळीबार करण्यास सुरूवात केली.

दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केल्यानंतर प्रकाश जाधव यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना मागे ढकलून दिलं आणि दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला सामोरे गेले. दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत प्रकाश जाधवांनी एका दहशतवाद्याला यमसदनी धाडलं.

याचदरम्यान एका दहशतवाद्याने पेट्रोल बॉम्ब फेकला. त्यानंतर जवान प्रकाश जाधव यांनी आपल्या सहकारी जवानांना घराच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले. या धुमचश्क्रीत प्रकाश जाधव यांनी पुन्हा दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. मात्र, तोपर्यंत प्रकाश जाधवांचा दहशतवाद्यांच्या गोळीने वेध घेतला होता.

जखमी झालेल्या प्रकाश जाधव यांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार सुरूच ठेवला. याच दरम्यान दहशतवाद्याने फेकलेल्या पेट्रोल बॉम्बचा स्फोट झाला आमि संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. या आगीतून बाहेर पडण्यात प्रकाश जाधव अपयशी ठरले आणि देशानं कर्तृत्वान सुपूत्र गमावला.

कीर्ती चक्राबद्दलची माहिती

कीर्ती चक्र पदक चांदीच्या धातूपासून बनवलेलं असतं. पूर्वीच्या अशोक चक्र वर्ग-2चं नाव बदलून किर्ती चक्र असं करण्यात आलं. थोडक्यात अशोक चक्राप्रमाणे हा सन्मानही शत्रूशी लढण्यासाठी नव्हे, तर इतर वेळी शौर्य दाखवून शांतता प्रस्थापित करण्याच्या अत्यंत अवघड कामगिरीसाठी देण्यात येतो. कीर्ती चक्राच्या पदकावर मधोमध अशोक चक्र व सभोवती कमळ फुले व कळ्यांचे कडे रेखलेलं असते. तर पाठीमागच्या बाजूला देवनागरी आणि इंग्रजीमध्ये किर्ती चक्र लिहिलेले असते. या दोन्ही भाषांच्या अक्षरांच्याच मध्ये दोन कमळं आहेत. या पदकाची रिबिन हिरव्या रंगाची असते. दोन उभ्या नारिंगी रंगांच्या रेघांनी या हिरव्या रंगाच्या पट्टीचे तीन समान भाग केलेले असतात.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in