
पुण्यात ड्रोनवर विराजमान झालेल्या गणपती बाप्पाची चांगलीच चर्चा रंगली होती. याचं कारणही तसंच खास होतं कारण पुण्यातील हडपसार भागात असलेल्या स्टार्टअप कंपनीत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती ड्रोनवर ठेवली त्यानंतर प्राणप्रतिष्ठेच्या ठिकाणी ही मूर्ती ड्रोनद्वारे पोहचवली.
पुण्यात झालेल्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची चर्चा आहे. मुंबई तकला माहिती देत फाउंडर संस्थापक गणेश थोरातने सांगितले की त्याने आणि त्याच्या मित्राने ही स्टार्ट-अप कंपनी एक वर्षा पहिले सुरु केली. भारतीय बनावटीचे अत्याधुनिक ड्रोन्स तयार करणे हा या कंपनी सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. ज्या ड्रोनवर गणपती बसवण्यात आला आहे तो ड्रोन या विद्यार्थ्यांनीच विकसित केला आहे.
पुण्यातला गणेश उत्सव हा अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. मानाचे पाच गणपती आणि त्यांची मिरवणूक हे इथल्या गणेश उत्सवाचं वैशिष्ट्य आहे. अशात सध्या उत्सवावार कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे प्रतिबंध पाळूनच साधेपणाने उत्सव साजरा केला जातो आहे.
अशात पुण्यातल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ड्रोनवर गणपतीची मूर्ती ठेवली आणि ती मूर्ती प्रतिष्ठापनेच्या ठिकाणापर्यंत नेली याची चांगलीच चर्चा पुण्यात होते आहे.