Ganeshotsav 2021 : अवलिया कलाकार! साबुदाण्यापासून साकारला 'विघ्नहर्ता'

Ganesh chaturthi 20201 : जळगावातील मूर्तीकर रामकृष्ण पाल हातांची कमाल...
गणपतीची मूर्ती तयार करण्यात मग्न असलेले मूर्तिकार पाल.
गणपतीची मूर्ती तयार करण्यात मग्न असलेले मूर्तिकार पाल.

-मनीष जोग

आजवर आपण नारळ, वृत्तपत्र, सोनं व चांदीपासून गणेशमूर्ती साकारल्याचं ऐकलं असेल, पण कधी साबुदाण्यापासून गणेशमूर्ती बनवल्याचं ऐकलंत का? नाही ना... जळगावात एका अवलिया बंगाली मूर्तिकारानं चक्क नायलॉन साबुदाण्यापासून 5 फुटी आकर्षक गणेशमूर्ती साकारली आहे. सध्या ही मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे.

रामकृष्ण साचूगोपाल पाल (वय 41) असं या मूर्तिकाराचे नाव आहे. रामकृष्ण पाल हे मूळचे पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील रहिवासी आहेत. मूर्ती साकारण्याचा त्यांचा पिढीजात व्यवसाय असून, ते गेल्या 15 वर्षांपासून जळगावात विविध मूर्ती साकारण्याचे काम करतात.

त्यांच्यासोबत त्यांचे इतर 10 ते 12 कारागीर देखील मूर्ती बनवण्याचं काम करतात. रामकृष्ण पाल हे दरवर्षी गणेशोत्सवासाठी वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित गणेशमूर्ती साकारतात. हेच वेगळेपण त्यांनी यंदाही जपलं आहे.

यापूर्वी त्यांनी चहापत्ती, शेंगदाणे, काजू-बदाम, बिस्कीट, नारळ तसेच विविध फळांपासून गणेशमूर्ती साकारल्या आहेत. गेल्या वर्षी मध्यप्रदेशातील खेतिया येथील एका गणेश मंडळाने त्यांच्याकडून नारळाची गणेशमूर्ती विकत घेतली होती.

यावर्षी याच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जरा हटके संकल्पनेवर गणेशमूर्ती साकारण्याची विनंती केली होती. त्यानुसार रामकृष्ण पाल यांनी नायलॉन साबुदाण्यापासून गणेशमूर्ती साकारली. रामकृष्ण पाल यांना ही गणेशमूर्ती साकारण्यासाठी 20 दिवस लागले.

यासंदर्भात माहिती देताना पाल म्हणतात, 'या मूर्तीसाठी खास पश्चिम बंगाल येथून माती व गवत आणले होते. मातीपासून मूर्ती घडवल्यानंतर त्यावर नायलॉन साबुदाणे चिकटवले. मूर्तीसाठी तब्बल 50 किलो साबुदाणा लागला. मूर्ती आकारास आल्यावर तिला भारतीय तिरंग्याचा आकर्षक रंग देण्यात आला.'

'सजावटीसाठी निरनिराळ्या रंगांचे व आकाराचे मणी, अलंकार मूर्तीला घालण्यात आले. तेव्हा अतिशय देखणी व विलोभनीय मूर्ती तयार झाली. या मूर्तीची उंची 5 फूट असून, तिचे वजन जवळपास 5 क्विंटल इतके आहे. ही मूर्ती खेतिया येथील गणेश मंडळाने 15 हजार रुपयांत विकत घेतली,' असंही रामकृष्ण पाल यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in