Ganpati Visarjan 2021: 'बाप्पा कोरोनाचं संकट दूर कर', गणरायाला भावपूर्ण निरोप

Ganpati Visarjan 2021: आपल्या लाडक्या बाप्पाला गणेश हे भक्त जड अंतकरणाने निरोप देत आहेत.
Ganpati Visarjan 2021
Ganpati Visarjan 2021

मुंबई: महाराष्ट्रातील सर्वात मोठा समजला जाणारा सण म्हणजे गणेशोत्स. 10 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती. अखेर आज (19 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता होत आहे. गेले 10 दिवस अतिशय थाटामाटात घरोघरी विराजमान झालेला बाप्पाला आता भाविक साश्रू नयनाने निरोप देत आहेत. यावेळी मुंबईसह अवघ्या महाराष्ट्रात अगदी साधेपणाने गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवदरम्यान कोणतीही मिरवणूक काढू नये असे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत. दरम्याान, यंदा राज्यातील अनेक गणेश भक्तांनी कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर होवो अशी प्रार्थनाच बाप्पाच्या चरणी केली आहे.

जाणून घेऊयात महाराष्ट्रात कशा प्रकारे करण्यात येत आहे बाप्पाचं विसर्जन:

मुंबई: अनंत चतुर्दशीला मुंबईच्या लालबाग-परळमधील सगळे रस्ते हे गर्दीने अक्षरशः फुलून गेलेले असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटामुळे अतिशय साधेपणाने बाप्पाला निरोप दिला जात आहे. कुठेही गर्दी होणार नाही याची खबरदारी मंडळं आणि पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

दुसरीकडे लालबाग राजाची एक झलक पाहता यावी यासाठी भक्त जवळपासच्या पुलांवर येऊन उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी लालबागच्या राजाची मिरवणूक ही भव्यदिव्य नाही. त्यामुळे अवघ्या काही तासातच राजा भायखळा परिसरात पोहोचला आहे.

पुणे: अनंत चतुर्दशी दिनी पुण्याच्या रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उत्सवाचे दहाही दिवस पुणेकरांनी शिस्तीचे पालन केलं असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, सर्व गणेश मंडळं हे आपआपल्या बाप्पांचे विसर्जन मंडपातील हौदातच करतील. ह्या वर्षी विसर्जन मिरवणूक निघणार नाहीत. त्यामुळे पुण्यातील महत्वाच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

अकोला: अकोल्यात यंदा मानाच्या गणपतीची सुद्धा मिरवणूक काढल्या जाणार नाही. त्यामुळे एकशे अठ्ठावीस वर्षांची परंपरा खंडीत झाली आहे. दुसरीकडे अकोल्यात वेगवेगळ्या ठिकाणी गणेश विसर्जनाला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. यासाठी प्रशासनाने शहरात एकूण सहा कृत्रिम तलाव निर्माण केले असून तिथे बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन केलं जात आहे. त्या ठिकाणी गणेशभक्त आणि नागरिक सुद्धा प्रशासनाने दिलेल्या संपूर्ण नियमाचे पालन करताना दिसत आहेत.

सोलापूर: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या अनुषंगाने सोलापूर शहरात एकदिवसीय जमावबंदी लागू करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेला परवानगी देण्यात आली आहे. शहरातील सर्व सार्वजनिक तलाव याठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे.

याचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी शिवगंगा मंदिर जवळ गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंडांची निर्मिती केलीय. या 14 कृत्रिम कुंडात मोठ्या प्रमाणात भाविकांकडून गणेश मूर्तींचे विसर्जन सुरु आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत.गणेशोत्सवावर देखील कोरोनाचे सावट पडले आहे. गणेश विसर्जनावेळी सोलापुरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवास गर्दी होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने सोलापुरात जागोजागी गणेश मूर्ती संकलन केंद्र स्थापन केले आहेत तर सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेत कृत्रिम विसर्जन कुंड स्थापन केले आहे.

गणेश भक्त आपल्या कुटुंबासह या कृत्रिम कुंडात बाप्पाचे विसर्जन करत आहेत. मागील वर्षीपासून हा उपक्रम राबविला जात असून मागील वर्षी 9 हजार गणेश मूर्तींचे विसर्जन या कुंडात झाले होते. चालू वर्षी आणखी 2 हजार मूर्तींची भर यात होईल असा अंदाज आहे.

Ganpati Visarjan 2021
Mumbai-Pune : इथे पाहा 'लालबागचा राजा'सह महत्त्वाच्या गणपती मंडळांचा विसर्जन सोहळा

सातारा: विघ्नहर्त्या बाप्पांच्या उत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. या पार्श्वभूमीवर सातार्‍यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 577 सार्वजनिक गणेश मंडळांच्या तर घरगुती 32 हजार 617 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले आहे. त्यामध्ये सातारा शहरातील 35 गणेश मंडळे व 2500 घरगुती गणेश मूर्तींचा समावेश होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकांना व जल्लोषाला फाटा देण्यात आला असून शांततेने व भक्तीमय वातावरणात हे विसर्जन झाले.

कोरोनामुळे यावर्षी सुध्दा मिरवणुका न काढताच सातारा शहर व परिसरासह जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात आपल्या लाडक्या विघ्नहर्त्यांना निरोप दिला.

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी संसर्गाची धास्ती कायम आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीला होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी पूर्वसंध्येलाच आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in