ST Strike: सरकारने निर्णयही जाहीर केला पण ST चा संप मिटला की नाही? हे तर जाणून घ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून संप पुकारला आहे. ज्यामुळे राज्यातील जनतेची विशेषत: ग्रामीण भागातील लोकांची खूपच अडचण होत आहे. अशावेळी संप मिटावा म्हणून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीचं शिष्टमंडळ आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी बुधवारी (24 नोव्हेंबर) अनेक तास चर्चा केली.

या अनेक तासांच्या चर्चेनंतर अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ज्याला गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे देखील हजर होते. आता या सगळ्या दरम्यान, नेमकं काय आणि कसं घडलं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

सीन क्रमांक 1

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याच पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी घोषणा केली की, ‘एसटी कामगारांचे पगार हे वाढविण्यात येत आहेत आणि त्यांचे पगार दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत होतील. पण विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे त्याविषयी प्रकरण कोर्टाकडे गेलं असून ते समितीच्या पुढे आहे.’

‘समिती त्यावर 12 आठवड्यात निर्णय घेणार असून तोवर कर्मचाऱ्यांनी संप ताणू नये. कामावर रुजू व्हावं. उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांनी आपलं काम सुरु करावं. तसं न करणाऱ्या कामगारांवर मात्र कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.’ असं अनिल परब म्हणाले.

ADVERTISEMENT

दरम्यान, यावेळी गोपीचंद पडळकर यांनी देखील मान्य केलं की, ‘एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहे. पण विलिनीकरणासाठी सरकारसमोर अडचणी आहेत. मात्र, असं असलं तरी संप किती वेळ सुरु ठेवायचा हे आपण आझाद मैदानातील कामगारांशी चर्चा करुन ठरवू आणि निर्णय संध्याकाळी साडेसात पर्यंत आपल्याला सांगू.’ असं पडळकर यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना सांगितलं.

ADVERTISEMENT

सीन क्रमांक 2

राज्य सरकारच्या पगारवाढीच्या घोषणेनंतर एसटी कामगार आपला संप मागे घेतील असंच सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळे आझाद मैदानावर संप पुकारलेल्या एसटी कामगारांना जेव्हा पत्रकारांनी सरकारच्या घोषणेबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया मात्र, अगदी वेगळी होती.

‘आम्हाला पगारवाढ नको.. आम्हाला फक्त आणि फक्त शासनात विलिनीकरण हवंय.’ या एकाच मागणीवर येथील कर्मचारी हे ठाम होते. आम्हाला सरकारचा निर्णय मान्य नाही. सरकार जोवर विलिनीकरणाचा निर्णय घेत नाही तोवर संप सुरुच राहील.’ अशी थेट भूमिका येथील कर्मचाऱ्यांनी घेतली.

सीन क्रमांक 3

एकीकडे सरकारमधील अनेकांना असं वाटत होतं की, एसटीचा संप आता मिटला. मात्र, कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने संपाबाबत एक प्रकारची अनिश्चितता दिसून आली. त्याचवेळी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे पत्रकार परिषद संपवून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले होते.

मैदानात येताच पत्रकारांनी या दोन्ही नेत्यांना घेरलं आणि त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकूणच परिस्थितीचा अंदाज घेऊन सावध पवित्र घेतला. ‘पहिले आम्हाला कर्मचाऱ्यांशी चर्चा करु द्या त्यानंतरच आम्ही आमचा काय निर्णय आहे ते सांगू.’ असं पडळकर आणि खोत म्हणाले.

सीन क्रमांक 4

मैदानात पोहचताच अनेक कर्मचाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांना घेराव घातला. सरकारचा निर्णय आम्हाला मान्य नाही असं थेट सगळ्यांसमोर त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता आपण मीडियाला नेमकं काय सांगायचं असाच प्रश्न या दोन्ही नेत्यांपुढे निर्माण झाला.

दरम्यान, त्याचवेळी सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी अत्यंत चाणाक्षपणे मीडियाला सांगितलं की, ‘आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करता आलेली नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आजची रात्र आझाद मैदानावरच काढावी. आम्ही सगळ्यांनी चर्चा करु आणि उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन आमचा नेमका काय निर्णय आहे ते आपल्याला कळवू.’

ST Strike: ST संपावर सरकारकडून तोडगा, ST च्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या पगारवाढीची घोषणा, पण…

दरम्यान, या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रातील जनतेला जो प्रश्न पडला आहे की, एसटीचा संप मिटला की नाही? तर त्याचं उत्तर सध्या तरी ‘नाही’ असंच आहे.

कारण एसटी कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आपण संप मागे घेत आहोत अशी कोणतीही अधिकृत घोषणा त्यांच्या संघटना किंवा कोणत्याही नेत्याने केलेली नाही. त्यामुळे आता गुरुवारी 11 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमका काय निर्णय जाहीर केला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT