...त्यावर मोदी म्हणाले, 'ते शेतकरी माझ्यासाठी मेलेत का?; राज्यपाल मलिकांचा खळबळजनक दावा

'नरेंद्र मोदी अहंकारी असून, पहिल्या 5 मिनिटांमध्येच माझं आणि त्यांचा वाद झाला'; मेघालयाच्या राज्यपालांचा व्हिडीओ व्हायरल
...त्यावर मोदी म्हणाले, 'ते शेतकरी माझ्यासाठी मेलेत का?; राज्यपाल मलिकांचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल सत्यपाल मलिक.

कृषी कायद्यांवरून दिल्लीतील मोदी सरकारवर टीका करणारे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीतील चर्चेबद्दल मोठा खुलासा केला आहे. कृषी कायद्यासंदर्भात मोदींची भेट घेतली. त्यावेळी पहिल्या 5 मिनिटातच आमच्यामध्ये वाद झाला, असा दावाही मेघालयचे राज्यपाल मलिक यांनी केला आहे. मलिक यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. काँग्रेसनेही यावरून मोदींवर निशाणा साधला आहे.

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हरयाणातील दादरी येथे झालेल्या कार्यक्रमात केलेल्या विधानाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. एका सामाजिक कार्यक्रमात बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले, "शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मी जेव्हा पंतप्रधानांना भेटलो, त्यावेळी पाच मिनिटांमध्येच माझा आणि त्यांचा वाद झाला. ते खूप अहंकारामध्ये होते. जेव्हा मी त्यांना म्हणालो की, 'आपल्या 500 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यावर ते (मोदी) म्हणाले, 'माझ्यासाठी मेले आहेत का?.'

त्यावर मी त्यांना (मोदी) म्हणालो की, "तुमच्यासाठीच तर मेले आहेत. कारण तुम्हा राजा बनलेला आहात. यावरूनच माझा त्यांच्याशी वाद झाला", असं मलिक यांनी म्हटलेलं आहे. पुढे बोलताना मलिक म्हणाले, 'पंतप्रधान म्हणाले, तुम्ही अमित शाह यांची भेट घ्या. त्यानंतर मी अमित शाह यांनाही भेटलो. एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तरी पंतप्रधान शोक व्यक्त करतात, पण शेतकऱ्यांच्या मृत्यूंवर ते गप्प राहिले", असं विधान मलिक यांनी केलं आहे.

काँग्रेसने साधला निशाणा

राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. काँग्रेसनेही सोशल मीडिया हॅण्डलवरून हा व्हिडीओ शेअर केला असून, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. "अहंकार... क्रूर आणि असंवेदनशील... भाजपच्या राज्यपालांच्या या मतामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यातील गुणांचा समावेश आहे. पण लोकशाहीसाठी ही चिंतेची गोष्ट आहे," अशी टीका काँग्रेसने केली आहे.

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी हे विधान केलं आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो, त्यामुळे हे कायदे मागे घेण्यात आल्याची चर्चाही कायदे रद्द केल्यापासून सातत्याने होत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in