गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी मोदी-शाहांचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अहमदाबाद: भारतीय जनता पक्षाने अवघ्या 24 तासांच्या आत गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांची नावाची घोषणा केली आहे. गुजरातच्या अहमदाबादच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेलेले भूपेंद्र पटेल हे आता थेट गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

भूपेंद्र पटेल हे पहिल्यांदा 2017 साली आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर अवघ्या चारच वर्षात भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे.

गुजरातमध्ये जेवढ्या आश्चर्यकारकरित्या विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं तेवढ्याच आश्चर्यकारकरित्या नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे मोदी-शाह आणि जे.पी. नड्डा यांच्या नव्या भाजपने आपला ‘सरप्राइज’ फॅक्टर कायम ठेवला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र, गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडताना यावेळी मोदी-शाह यांनी महाराष्ट्र पॅटर्नचा वापर केल्याचं दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड आणि मोदी-शाहांचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’

ADVERTISEMENT

गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करताना यावेळी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र महाराष्ट्र पॅटर्नचा वापर केला आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात येथील रुपाणी सरकार अपयशी ठरल्याने गुजरातमध्ये त्यांच्या सरकारविरुद्ध जनतेमध्ये नाराजी असल्याचं दिसून होती. तसेच वर्षभरात येथे विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री पदावरुन हटविण्याचा निर्णय घेतला.

दुसरीकडे नवे मुख्यमंत्री निवडताना मात्र, मोदी-शाह यांच्या जोडीने यावेळेस महाराष्ट्र पॅटर्नचा वापर केला. आपल्या आजवरच्या राजकारणात या जोडगोळीने अनेकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून नरेंद्र मोदी यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन काही राजकीय निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय.

जेव्हा भाजपची सगळी सूत्रं ही मोदी-शाह यांच्या हाती आली तेव्हा या धक्कातंत्राची व्याप्ती वाढत गेली. याचचं एक उदाहरण आता देखील पाहायला मिळालं. ज्यामध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’चा वापर करण्यात आला.

मोदी-शाह यांचा राजकारणातील ‘महाराष्ट्र पॅटर्न’ नेमका आहे तरी काय?

2014 साली विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष हे स्वबळावर लढले होते. त्यावेळी भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे तेव्हा भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. दुसरीकडे सुरुवातीला शिवसेनेने भाजपला पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली होती. असं असतानाही भाजपे सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला. अशा गोंधळाच्या परिस्थितीत भाजपचं नेतृत्व कोणाकडे सोपवलं जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं.

अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एका अशा नावाला पसंती दिली की ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मोदी-शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली होती. 2014 लोकसभा निवडणुकीनंतर अशा प्रकारचा मोठा राजकीय निर्णय घेण्याची मोदी-शाह यांची ही पहिलीच वेळ होती. त्यावेळी मोदी-शाह यांनी पहिल्यांदा धक्कातंत्राचा वापर केला.

एखाद्या मंत्रिपदाचाही अनुभव नसलेल्या देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी थेट मुख्यमंत्री करण्याचा निर्णय मोदी आणि शाह यांनी घेतला होता. यावेळी राज्यातील भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना बाजूला सारुन फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. हाच पॅटर्न मोदी-शाह यांचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ म्हणून पुढे प्रचलित झाला. ज्यानंतर त्यांनी अनेकदा अशा स्वरुपाचे निर्णय घेतले. उत्तरप्रदेशमध्ये देखील भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांना मुख्यमंत्री पद न देता योगी आदित्यनाथ या नावाला पसंती देण्यात आली होती. पण अशा निर्णयांची खरी सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली होती.

याच महाराष्ट्र पॅटर्नचा वापर आता गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी करण्यात आला आहे. विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून अनेकांच्या नावाची चर्चा होती. त्यातही उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांची नावं आघाडीवर होती.

Gujrat CM : पहिल्यांदाच आमदार झाले अन् भाजपने केलं मुख्यमंत्री; कोण आहेत भूपेंद्र पटेल?

दरम्यान, असं असताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाही फारशी कल्पना न देता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने भूपेंद्र पटेल या पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदाराच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. पहिल्यांदाच आमदारा झालेले भूपेंद्र पटेल यांना देखील देवेंद्र फडणवीस यांचा सारखाच कोणत्याही मंत्रिरपदाचा अनुभव नाही. मात्र तरीही मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यामुळेच आज जरी गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडले गेले असले तरीही चर्चा मात्र मोदी-शाह यांच्या ‘महाराष्ट्र पॅटर्नची’च आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT