अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांच्या खळबळजनक हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत गुन्ह्याची उकल केल्याचा दावा केला आहे. या खून प्रकरणातील संशयित विनोद मराठी उर्फ विनोद गायकवाड याला गुन्हे शाखेने अटक केली असून त्याची सध्या कसून चौकशी सुरू आहे
एकाच घरातील चार जणांची हत्या झाल्याने अहमदाबादमध्ये एकच खळबळ माजली होती. पोलिसांना एकाच घरात चार कुजलेले मृतदेह सापडले होते. अहमदाबादच्या ओढव परिसरात एक महिला, तिची 15 आणि 17 वर्षांची दोन मुले आणि महिलेच्या आजीची हत्या करण्यात आली होती.
या घटनेच्या 48 तासांच्या आत अहमदाबाद क्राइम ब्रँचने कथित हत्येप्रकरणी महिलेचा पती विनोद याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपी सुरतला पळून गेला होता आणि नंतर सुरत सोडून तो इंदूरला गेला होता.
दरम्यान, तो इंदूरहून देखील पळण्याच्या तयारीत होता. तेव्हाच गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले. आरोपी विनोदला आता इंदूरहून गुजरातला आणण्यात आले आहे.
अहवालानुसार, एकाच वेळी चार-चार जणांची हत्या करणारा आरोपी सतत आपले स्टेटमेंट बदलत आहेत. तसेच आपल्याच पत्नी आणि मुलांची हत्या का केली हे मात्र अद्यापही सांगत नाहीए. पण त्याने क्राइम ब्रांचला एवढं मात्र सांगितलं आहे की, त्याला एकाही प्रत्यक्षदर्शीला जिवंत सोडायचं नव्हतं म्हणूनच त्याने कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या केली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदने पत्नी, दोन मुले आणि आजी-सासू यांची हत्या केली. यापूर्वीही विनोदने आपल्या आजी-सासूवर हल्ला केला होता. आजी-सासू ही त्याच परिसरात दुसऱ्या घरी राहत होती. मात्र, आपल्या नातीचा विचार करून सासूने या हल्ल्याची माहिती कोणालाही दिली नव्हती.
विनोद गायकवाड उर्फ विनोद मराठी हा ओढव परिसरातच टेम्पो चालवण्याचे काम करतो. काही काळ आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विनोद आणि त्याच्या पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होत होती.
मात्र, असं असलं तरीही एकाच वेळी चार जणांच्या हत्या करण्याचं नेमकं कारण अद्याप तरी समोर आलेलं नाही. मात्र, या प्रकरणी क्राईम ब्राँच आरोपीची चौकशी करत आहेतच तसेच इतरही बाबी तपासून पाहत आहेत.