Cyclone Gulab : मराठवाड्यात हाहाकार! नद्यांचा रौद्रवतार, धरणं तुडुंब; मदतकार्याला वेग

heavy rain in marathwada : मराठवाड्यातील नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसला...
Cyclone Gulab : मराठवाड्यात हाहाकार! नद्यांचा रौद्रवतार, धरणं तुडुंब; मदतकार्याला वेग
मराठवाड्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दृश्ये.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असून मराठवाड्यात दाणादाण उडाली आहे. संततधार पावसाने नद्यांना पूर आले आहेत. तर धरण तुडुंब भरली आहेत. नद्यांचं पाणी काठांवरील गावे आणि शेतांमध्ये शिरल्याने प्रचंड नुकसन झालं आहे.

अनेक ठिकाणी अजूनही पावसाचा जोर ओसरलेला नाही. दुसरीकडे पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात असून, नदीकाठावरील गावांना सर्तकतेचे आदेश देण्यात आले आहे. मराठवाड्यातील नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर केला असून शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज असुन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी बांधावर उतरले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 459 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असून एनडीआरएफ टीमकडून 16 जणांचे बचाव कार्य यशस्वी झाले.

कळंब तालुक्यातील सौंदना या गावात पुरात अडकलेल्या 10 जणांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षितपणे काढले. मांजरा नदीला पूर आल्याने हे शेतकरी शेतात अडकले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 16 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून, मांजरा व तेरणा नदीला पूर आल आहे.

हिंगोली जिल्ह्यात अतिमुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, कयाधु नदीने रौद्ररूप धारण केले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सोडेगाव नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटलाय. कयाधु नदी परिसरातील सर्व शेती पुराखाली गेलीय. नदीचे हे विक्राळ रूप शांत करण्यासाठी डोंगरगाव पूल येथील महिलांनी गंगा मायेची साडीचोळी खणा-नारळाने ओटी भरून विधीवत पूजा केली.

बीड जिल्ह्यात २७ जणांची सुखरुप सुटका

देवळा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या २७ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. आपेगाव येथील १८ जणांना बाहेर काढले आहे, तर आणखी २७ जण शेतात अडकले आहेत. त्यांनाही बाहेर काढले जात आहे.

तेरणा-मांजरा धरण भरले

मुसळधार पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा-मांजरा धरण भरलं आहे. अनेक गावांत पुलावरून पाणी वाहत आहे. तेरणा धरण भागात पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे व लोक पाण्यात उतरून फोटो काढत असल्यानं जीवितहानी होण्याची भीती आहे.

किनगाव पाझर तलाव ओव्हर फ्लो

लातूर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यातील किनगाव या गावालगत असलेला तलाव ओवर फ्लो झाला आहे. तलावा शेजारील शेतकऱ्यांच्या शेतात पाणि घुसून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री परिसरात अतिवृष्टी झाल्यानं अनेक पिके व बागायतदार शेतकऱ्यांना फटका बसला.

लातूर जिल्ह्यात बचाव कार्याला वेग

लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूर यांच्याकडून पुरात अडकेल्या व्यक्तींना सुरक्षितपण बाहेर काढण्यासाठी स्थानिक पातळीवरील 3 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात रबर बोट ओबीएम मशिनसह इतर पुरांसबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.

डिंभे धरणातून घोडनदी पात्रात विसर्ग

उत्तर पुणे जिल्ह्याच्या भीमाशंकर माळीन परिसरात आज दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरणातून ५०४० क्‍युसेकने घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, पावसाचा जोर जर अजून वाढला तर धरणातून पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात अजून वाढवला जाण्याची शक्यता असून प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागपूर- तुळजापूर महामार्ग बंद

ईसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर पैनगंगा नदीला पूर आला आहे. कयाधू नदीचे पाणी देखील पैनगंगेला मिळाले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी विदर्भ-मराठवाडाला जोडणाऱ्या उमरखेडमधील मार्लेगाव पुलावर पाणी पोहोचले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी मार्लेगाव पुलावरून वाहतूक बंद केली आहे. नागपूर बोरी-तूळजापूर हा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

गोदावरीच्या काठावरील नागरिकांना इशारा

नाशिक जिल्ह्यालाही मंगळवारी पावसाने झोडपले. नांदगावमधील काही भागांचा संपर्क पुरामुळे तुटला आहे. गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाणार असून, गोदावरी नदीपात्राच्या पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांनी व नागरिकांनी सतर्क राहावं, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.