Gulab Cyclone : गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात पूर; महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात रेड अलर्ट

Gulab Cyclone Flood Situation in Marathwada: गुलाब चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत असून मराठवाड्यात तर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Gulab Cyclone : गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात पूर; महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात रेड अलर्ट
Gulab Cyclone Flood Situation in Marathwada

औरंगाबाद: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 'गुलाब' चक्रीवादळाची निर्मिती झाली. हे वादळ आंधप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला धडकलं असून इथे मुसळधार पाऊस सुरु आहे. याच वादळाचा परिणाम हा महाराष्ट्रातील मराठवाड्यात दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून इथे जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु असून मराठवाड्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

जाणून घेऊयात मराठवाड्यात नेमकी काय स्थिती आहे.

बीड: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

सोमवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील ओढे, नद्या क्षमतेबाहेर वाहत असून अनेक गावांत पाणी शिरले असून गावांचा संपर्क देखील तुटला आहे.

अनके ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले असल्याने दळणवळण बंद आहे. तर शेती आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. मांजरा धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे मंगळवारी पहाटे धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.

बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी पुलावरून पाणी जात असल्याने काही ठिकाणी गाड्या अडकल्याची देखील माहिती मिळत आहे.

बीडमधील देवळा गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून 40 लोक शेतात अडकून पडले आहेत. तर काही जनावरे वाहून गेल्याची देखील माहिती मिळत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येथील परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उस्मानाबाद: पावसाचं रौद्ररूप; सगळीकडे पाणीच-पाणी

उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा, मांजरा भागासह जिल्ह्यात रात्री सर्वदूर पाऊस झाला आहे. पावसामुळे नदी नाल्यानं पूर आला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. कापणीसाठी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावात व नागरिकच्या घरात पाणी शिरले.

पावसाच्या पाण्याने पूर आल्याने रस्ते वाहतूक बंद पडली आहे. तसेच नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याची प्रशासनने सूचना दिल्या आहेत.

लातूर: मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे

लातूरमधील मांजरा प्रकल्पात सातत्याने पाण्याची आवक सुरु असल्याने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. पूर नियंत्रण करण्यासाठी धरणातील अतिरिक्त पाणी मांजरा नदीद्वारे तसेच कालव्यातून ठरवलेल्या नियमाप्रमाणे सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

मांजरा नदीवरील बॅरेजेस देखील पूर्णपणे भरले असून धरणातून अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडल्यास तसेच येणारी पाण्याची आवक वाढत राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मांजरा नदीवरील सर्व नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये पुढील दोन-तीन दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता असल्याने व जिल्हयातील काही मध्यम प्रकल्प/ बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत व काही मध्यम प्रकल्प भरण्याची शक्यता निर्माण झाली असून परिस्थितीनुरुप केव्हाही प्रकल्पातील पाणी विसर्ग करावे लागणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क रहावे. संभाव्य पूरपरिस्थिती व वीज कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस सुरु असताना शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे, कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात जाऊ नये. जिल्हयातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने कोणीही, जलसाठे पाण्यासाठी/पर्यटनासाठी जाऊ नये. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे.

नदीपात्राजवळ घरे असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, आपल्या गरजेच्या वस्तू (उदा.औषधी, रोख रक्कम) स्वत: जवळ बाळगावे. नदीपात्राजवळ आपली जनावरे बांधू नयेत. जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

या कालावधीत वीज कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी/नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते 7 या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये. कारण सदर वेळेत वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली/पाण्याच्या स्त्रोताजवळ/विदयुत खांबाजवळ बांधू नयेत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा.

शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे. पुलावरुन/नाल्यावरुन पाणी वाहत असताना कोणीही स्वत:किंवा वाहनासह पूल/नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये. पाऊस सुरु असताना विजेच्या तारा/जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. असे आव्हान लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Gulab Cyclone Flood Situation in Marathwada
Gulab Cyclone: प्रवाशांसह पुराच्या पाण्यात ST बस गेली वाहून, एकाचा मृतदेह हाती

हिंगोली: मुसळधार पाऊसाने नदी नाल्यांना पूर

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. हिंगोली शहरातील बावन्न खोली, रेल्वे फाटक पूल परिसरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून पाणी साचलं आहे. तर वसमत, औंढा, कळमनुरी, सेनगाव तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.

वसमत तालुक्यातील टेम्भुर्णी गावात ओढ्याचे पाणी शिरले आहे. काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपोयोगी वस्तूंचे नुकसान झालं आहे. वसमत ते जवळा बाजार रस्तावरील कळलावी नदीला पूर आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. जिल्ह्यातील कयाधु नदी धोक्याच्या पातळीने वाहत असून सोडेगाव नांदापूरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरा फाटा ते बोलडा फाटा परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पैनगंगा नदीच्या पात्रात इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे.

'या' आठ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक या शहरांसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.